24 व्या वर्षी नेतृत्वाची धुरा : हार्दिकचा गुजरातला अलविदा, मुंबईत घरवापसी :
वृत्तसंस्था/ मुंबई
आयपीएल 2024 स्पर्धेला सुरुवात होण्यासाठी अजून काही महिन्यांचा वेळ आहे. मात्र, त्यापूर्वी काही संघांमध्ये मोठे फेरबदल झाले आहेत. गुजरात टायटन्स संघाने कर्णधार हार्दिक पंड्याला रिलीज केले आहे. पंड्या आता मुंबई इंडियन्स संघाकडून खेळेल. अशात, युवा फलंदाज शुभमन गिल गुजरात टायटन्स संघाचा कर्णधार बनला आहे. विशेष म्हणजे, संघात केन विल्यम्सनसारखा अनुभवी खेळाडू असताना 24 वर्षीय गिलकडे कर्णधारपद सोपवल्यामुळे क्रिकेटप्रेमींच्या भुवया उंचावल्या आहेत.
शुभमन गिलने मागील 2 वर्षांमध्ये खूपच प्रगती केली आहे. आम्ही त्याला फक्त फलंदाजाच्या रुपात नाही, तर एका लीडरच्या रुपातही परिपक्व होताना पाहिले. याची परिपक्वता आणि कौशल्य मैदानावरील प्रदर्शनातून स्पष्टपणे दिसते. आम्ही त्याला कर्णधार बनवण्यासाठी उत्साही आहोत, अशी प्रतिक्रिया गुजरात संघाचे संचालक विक्रम सोळंकी यांनी दिली. दरम्यान, सोळंकी यांनी हार्दिकला त्याच्या भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आणि या अष्टपैलू खेळाडूने फ्रँचायझी सोडण्याची इच्छा व्यक्त केली असल्याचेही सांगितले.
गिल हा गतहंगामात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता. त्याने 17 सामन्यात 890 धावा करताना ऑरेंज कॅप नावावर केली होती. न्यूझीलंडचा स्टार फलंदाज केन विल्यम्सन हा गुजरातचा कर्णधार बनण्याच्या शर्यतीत होता, पण फ्रँचायझीने भविष्य लक्षात घेता या 24 वर्षीय भारतीय युवा खेळाडूला प्राधान्य दिले आहे. गिलने 2018 मध्ये कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून आयपीएल पदार्पण केले होते. त्याने कारकीर्दीत आतापर्यंत 91 सामने खेळले आहेत.
हार्दिकची मुंबईत घरवापसी
मुंबई इंडियन्सने हार्दिक पंड्याला पुन्हा एकदा संघात सामील करून चाहत्यांना आश्चर्यांचा धक्का दिला. हार्दिकच्या पुनरागमनामुळे मुंबई इंडियन्सच्या संघप्रमुख नीता अंबानी यांना खूप आनंद झाला. त्यांनी खास पद्धतीने हार्दिकचे मुंबई इंडियन्समध्ये स्वागत केले. हार्दिक संघात परतल्याने आम्हाला खूप आनंद झाला आहे. मुंबई इंडियन्सचा युवा खेळाडू ते भारतीय संघाचा स्टार बनण्यापर्यंत खूप लांब पल्ला त्याने गाठला आहे, अशी प्रतिक्रिया नीता अंबानी यांनी दिली आहे.
नाट्यामय घडामोडीनंतर हार्दिकचा मार्ग मोकळा
हार्दिकला आपल्या ताफ्यात घेण्यासाठी मुंबईने ‘ऑल कॅश ट्रेड‘चा आधार घेतला. त्यामुळे हार्दिकची मुंबई इंडियन्समधील घरवापसी निश्चित झाली. गुजरात टायटन्ससोबत औपचारिक स्वरुपात व्यवहार पूर्ण झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. पण औपचारिक कागदोपत्री व्यवहार अद्याप तरी पूर्ण झालेली नव्हती. ट्रेड ऑफ रविवारी संध्याकाळी 5 नंतर पूर्ण झाल्याची माहिती बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. हा व्यवहार आता अधिकृत झाला असून हार्दिक आता मुंबई इंडियन्सचा खेळाडू आहे, अशी माहिती अधिकाऱ्याने दिली. दरम्यान, मुंबईने हार्दिकला 15 कोटी रुपयांत ट्रेड केले आहे. हा आयपीएलमधील सर्वात मोठा ट्रेड मानला जात आहे.
मुंबईने आपल्यातील अष्टपैलू कॅमेरॉन ग्रीनला ऑल कॅश व्यवहारात रॉयल चॅलेंजर्स बँगलोरसोबत ट्रेड केले. त्यानंतर त्यांच्याकडे गुजरातसोबत संपूर्ण व्यवहार रोखीत करण्यासाठी आणि हार्दिकला आपल्याकडे घेण्यासाठी आवश्यक रक्कम उपलब्ध झाली. गेल्या लिलावात मुंबईने ग्रीनला 17.5 कोटी रुपयांची बोली लावून खरेदी केले होते. त्यामुळे जोपर्यंत ग्रीनला एखादा संघ ट्रेड करत नाही, तोपर्यंत मुंबईकडे पंड्याला खरेदी करण्यासाठी पुरेशी रक्कम उपलब्ध नव्हती. रविवारी सायंकाळी या नाट्यामय घडामोडी घडल्यानंतर हार्दिक मुंबई संघात दाखल झाला.
हार्दिकने आयपीएल कारकीर्दीची सुरुवात 2015 मध्ये केली होती. त्याला मुंबई इंडियन्स संघाने 10 लाख रुपयांमध्ये आपल्या ताफ्यात सामील केले होते. तो 2015 ते 2021 यादरम्यान संघाचा भाग होता. तो 2015, 2017, 2019 आणि 2020 या हंगामाचा किताब जिंकणाऱ्या मुंबई इंडियन्स संघाचा भाग होता. मात्र, आयपीएल 2022 च्या मेगा लिलावात त्याला मुंबईने रिलीज केले होते. असे असले, तरीही दोन वर्षांनंतर पंड्या पुन्हा एकदा मुंबईच्या ताफ्यात परतला आहे.
कॅमेरॉन ग्रीन आता आरसीबीकडे
मुंबई इंडियन्स हार्दिक पंड्याला आपल्या ताफ्यात घेणार असल्याची चर्चा होती. अखेर रविवारी पंड्याची घरवापसी झाली. पण त्यासाठी मुंबईने ऑस्ट्रेलियाचा स्टार अष्टपैलू खेळाडू कॅमेरॉन ग्रीनला रिलीज केले. गेल्या हंगामात तो मुंबईकडून सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर होता. हार्दिक 15 कोटी रुपयांच्या किमतीत मुंबईकडे पोहोचला. त्या बदल्यात त्यांना ही रक्कम जुळवण्यासाठी अष्टपैलू ग्रीनला ट्रेड करावे लागले. रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने त्याला 17 कोटी 50 लाख या मोठ्या किमतीत आपल्याकडे खेचले. यामुळे मुंबईकडे आयपीएल लिलावात अडीच कोटी रुपये अधिकचे शिल्लक राहिले. ग्रीन मागील वर्षी प्रथमच आयपीएलमध्ये सहभागी झाला होता. साडेसतरा कोटींची मोठी रक्कम मिळाल्यानंतर त्याने मुंबईसाठी चांगली कामगिरी देखील केली होती. त्याने स्पर्धेत 16 सामने खेळताना 452 धावा केल्या होत्या. आता, ग्रीन आरसीबीचा भाग झाल्याने आरसीबीची फलंदाजी आता अधिक स्फोटक दिसून येते.
रोमांचक ब्रँडसह नेतृत्व करण्यास उत्सुक : गिल
मला गुजरात संघाचे कर्णधारपद स्वीकारताना अभिमान वाटत आहे. माझ्यावर विश्वास दाखवल्याबद्दल मी फ्रँचायझीला धन्यवाद देतो. आमचे दोन हंगाम शानदार राहिले आहेत. मी क्रिकेटच्या आमच्या रोमांचक ब्रँडसह संघाचे नेतृत्व करण्यासाठी उत्सुक असल्याची प्रतिक्रिया कर्णधारपदाची जबाबदारी स्वीकारताच शुभमन गिलने दिली.
जुन्या आठवणी पुन्हा ताज्या
मुंबई इंडियन्समध्ये सहभागी झाल्यामुळे खूप आठवणी पुन्हा ताज्या झाल्या आहेत. मुंबई, वानखेडे, पलटन, पुनरागमन हे सर्व चांगले वाटत आहे. आगामी नव्या हंगामासाठी उत्सुक असल्याची प्रतिक्रिया मुंबई संघात दाखल झाल्यानंतर हार्दिकने दिली.









