दिवसभरात 5 घटनांची नोंद : प्रूट मार्केटनजीक गादी दुकानाला भीषण आग
प्रतिनिधी /बेळगाव
बेळगावसह परिसरात शुक्रवारी आग लागण्याच्या तब्बल पाच घटना घडल्या. यामुळे दिवसभरात अग्निशमन दलाच्या जवानांना तारेवरची कसरत करावी लागली. प्रूट मार्केटजवळ गादीच्या कारखान्याला, बॉक्साईट रोड येथे गॅस गळतीमुळे लागलेली आग, भुतरामहट्टीत गवतगंजीला, कंग्राळी बुद्रुक येथे जनावरांच्या गोठय़ाला व मिलिटरी परिसरात गवताला आग लागण्याची घटना शुक्रवारी घडली. यामुळे दिवसभरात शहर व परिसरात आगीचे तांडव पहायला मिळाले.
प्रूट मार्केटनजीक एका गादीच्या कारखान्याला दुपारी अडीजच्या सुमारास आग लागली. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी गाद्या तयार करण्यासाठी आणलेला कापूस खाक झाला. कापसाने अचानक पेट घेतल्याने आगीचे लोळ बाहेर पडू लागले. स्थानिकांनी दुकानातील लोकांना तात्काळ बाहेर काढले. आगीमुळे आजूबाजूच्या इमारतींनाही धक्का पोहोचला. शेजारीच हॉस्पिटल व दुकाने असल्यामुळे नागरिकांना बाहेर काढले. घटनास्थळी अग्निशमन जवानांनी आग विझविण्यास सुरुवात केली. कापसाने पेट घेतल्याने पूर्ण आग नियंत्रणात आणण्यासाठी सायंकाळपर्यंत प्रयत्न करावे लागले.
बेळगाव येथील अग्निशमन विभागाचे 3 तर खानापूर येथील 1 अग्निशमन बंब घटनास्थळी आग विझविण्यासाठी प्रयत्न करीत होते. आग मोठी असल्यामुळे बघ्यांची गर्दी झाली होती. रात्री उशिरापर्यंत आग विझविण्याचे व नुकसानभरपाई नोंद करण्याचे काम सुरू होते.
भुतरामहट्टी येथे गवतगंजीला आग लागली होती. अचानक लागलेल्या आगीमुळे शेतकऱयांचे नुकसान झाले. अग्निशमन विभागाच्या जवानांनी घटनास्थळी पोहोचत आग आटोक्मयात आणली. कंग्राळी बुद्रुक येथे गोठय़ाला आग लागून नुकसान झाले. तसेच मिलिटरी परिसरातदेखील आगीची घटना घडली. अग्निशमन विभागाकडे पाण्याचे बंब कमी असल्यामुळे अखेर एअरफोर्सच्या अग्निशमन बंबाने आग विझविण्यात आल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. दिवसभरात आग लागण्याच्या पाच घटना घडल्यामुळे शुक्रवारी आगीचे तांडव दिसून आले.









