नवी दिल्ली :
ऑनलाइन पद्धतीने किराणा वस्तू आणि ताज्या खाद्यपदार्थांची खरेदी होण्याच्या प्रमाणात गेल्या काही महिन्यात बऱयापैकी वाढ दिसून आली आहे. त्यामुळे भविष्यकाळात शीतगृहांची मागणी वाढणार आहे. शीतगृहांची आवश्यकता भारतात 2023 पर्यंत दुपटीने वाढणार असल्याचा अंदाज या क्षेत्रातील जाणकारांनी व्यक्त केला आहे. 2019 मध्ये शीतगृह साठवणूक क्षमता 37 ते 39 दशलक्ष टन इतकी होती. यामध्ये पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, हरियाणा, महाराष्ट्र, कर्नाटक, पंजाब, गुजरात, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश यांचा वाटा 91 टक्के इतका होता. कोरोनामुळे गेल्या काही महिन्यात ऑनलाइन मागणीत कमालीची वाढ झाली असल्याचा सकारात्मक परिणाम शीतगृह मागणीत दिसला असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे.









