सांगली : प्रतिनिधी
समाजकल्याण विभागाकडून मागासवर्गीय विद्यार्थ्यांकरीता विविध शिष्यवृत्ती योजना राबविल्या जात आहेत. जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाकडून सांगली जिल्ह्यातील इयत्ता 1 ली ते 10 वी मध्ये शिकणाऱ्या मागासवर्गीय मुलांसाठी मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्ती योजना राबविली जात आहे. ज्यांच्या पाल्यांना सन 2015-16 ते सन 2020-21 या शैक्षणिक वर्षामध्ये शिष्यवृत्ती प्रस्ताव सादर करूनही लाभ मिळालेला नसेल त्यांनी संबंधित शाळांशी त्वरीत संपर्क साधून शाळांना बँक खाते पासबुकाबाबत अद्ययावत माहिती द्यावी, असे आवाहन जिल्हा परिषद समाज कल्याण कार्यालयाकडून करण्यात आले आहे.
सन 2015-16 ते सन 2020-21 या शैक्षणिक वर्षामध्ये समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद सांगली कार्यालयाकडे शिष्यवृत्ती योजनांसाठी प्रस्ताव सादर केलेल्या काही विद्यार्थ्यांचे खाते तपशील शाळा स्तरावरून चुकीचे प्राप्त झाल्याने तसेच विद्यार्थ्यांची खाती बंद स्थितीत असल्याने अशा विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती रक्कम प्राप्त झालेली नाही. सदर अप्राप्त विद्यार्थ्यांची अनु.जाती प्रवर्ग व अस्वच्छ व्यवसाय शिष्यवृत्ती योजनानिहाय यादी पंचायत स्तरावरून संबंधित शाळांना उपलब्ध करून दिलेली असल्याचे जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाकडून कळविण्यात आले आहे.








