महामुनी शुकदेव परिक्षिती राजाला बाणासुराची कथा सांगताना पुढे म्हणतात –
एक ओहरां प्रशंसिती । कित्येक रामकृष्णांतें स्तविती । कित्येक हरियश उज्वळ गाती । विप्र पधती शान्तसूक्तें । गजदुंदुभि वाजती गजरें । काहळा मृदंग मंगळ तुरें । आनकगोमुखकंबुस्वरें । पूर्व द्वारें प्रवेशलें । आपुली राजधानी द्वारका । सालंकृता सकौतुका ।
रामकृष्ण यादवकटका । सहित स्वपुरिं प्रवेशले ।
वोहरें मिरवूनि हाटवटीं । आले नृपासनानिकटीं ।
उषा अनिरुद्ध पाहतां दृष्टी । तोषला पोटीं उग्रसेन ।
दोघां घेऊनि मांडियेवरी । वसनाभरणें अलंकारी ।
हस्त उतरोनि मुखावरी । म्हणे हरगौरीसम नांदा ।
रामकृष्णपद्युम्नमुखीं । राया वंदूनि निज मस्तकीं ।
उठूनि वसुदेवदेवकादिकें । स्नेहविशेषीं आलिंगिलें ।
नम्रमौळें करूनि अपरां । आज्ञा मागूनियां नृपवरा ।
मग येऊनि निजमंदिरा । माता समग्रा हरि वंदी ।
रामकृष्णादिकांच्या जननी । अनिरुद्ध उषा देखोनि नयनीं । आनंदभरित अंतःकरणीं । आशीर्वचनीं गौरविती । नातुनातसुनेचें मुख । पाहूनि रुक्मिणी मानी सुख । रेवतीहृदयीं न माय हरिख । तोषती अनेक हरिजाया । रतिरुक्मवती नंदनस्नुषा । देखोनि पावल्या परम तोषा । रोचनासदनीं गृहप्रवेशा । आले विदुषांसमवेत । करूनि लक्ष्मीपूजनासी । कनकमुद्रा ब्राह्मणांसी । भूरि वांटूनि हृषीकेशी । अहेर सुहृदांसी समर्पी । रोचना रति रुक्मवती । भाणवसातें निरोविती । म्हणती वृद्धाचाररीति । यथानिगुती तूं चाळीं । आपुले कंठींचीं कंठाभरणें । रत्नजडितें करकंकणें । समषेनि उषेकारणें । क्षीरप्राशनें करविती । आतां असो हा वृद्धाचार । कथितां ग्रंथ वाढेल फार । करूनि दिव्यान्नप्रकार । भोजनें नागर तोषविले ।
कैसें केलें उषाहरण । हरिहरांचें समराङ्गण ।
राया त्वां जें पुशिलें पूर्ण । तें संपूर्ण निरूपिलें ।
इकडे द्वारका ध्वजतोरणांनी सजविली गेली. सडका आणि चौकांमध्ये चंदनमिश्रित पाण्याचा सडा शिंपडला गेला. नगरातील नागरिक, बांधव आणि ब्राह्मण सामोरे आले. त्यावेळी शंख, नगारे आणि ढोल यांचा तुंबळ आवाज होता. अशा प्रकारे भगवान श्रीकृष्णांनी आपल्या राजधानीमध्ये प्रवेश केला. राजासह सर्व यादवांनी नव्या जोडप्याचे मोठय़ा उत्साहात स्वागत केले.
उषा अनिरुद्धाच्या प्रणय व विवाहाची, बाणासुराच्या गर्वहरणाची आणि शिव हरीच्या युद्धाची ही कथा मोठी रोचक आहे. वरवर पाहता भगवान महादेव व भगवान श्रीकृष्ण यांचे युद्ध या कथेत दिसते. पण ही एक ईश्वरी लीलाच नव्हे काय? हरी व हर यांच्यात भेद मुळात आहेच कोठे? तुकाराम महाराजांचा अभंग सुप्रसिद्ध आहे. हरीहरां भेद ।नाहीं करूं नये वाद । एक एकाचे हृदयीं ।गोडी साखरेच्या ठायीं । भेदकासी नाड ।एक वेलांटीच आड। उजवें वामांग ।तुका म्हणे एक चि अंग । हरी व हर हे एकाच शरीराचे उजवे व डावे अंगाप्रमाणे एकरूप आहेत.साखरेपासून गोडी वेगळी करता येत नाही त्याप्रमाणे शिव व विष्णू एकामेकापासून वेगळे करता येत नाहीत. शिवाने आपल्या प्रिय भक्ताचे गर्व हरण कृष्णाकडून करवले अशी ही सुंदर कथा.
Ad. देवदत्त परुळेकर








