प्रतिनिधी/ सातारा
मराठी माणसाचा मानबिंदू आणि स्वराज्य संस्थापक असणाऱया छत्रपती शिवाजी महाराजांचा राष्ट्रनिर्मितीसाठी प्रेरणा देणारा इतिहास हा खरोखरच सर्व पिढय़ांसाठी आदर्श असा आहे. छत्रपतींचा हा इतिहास मराठी चित्रपटातून सादर करण्याचे आव्हान दिग्पाल लांजेकर यांच्यासारख्या मराठी चित्रपट दिग्दर्शकाने उचलले आणि केवळ दोन ते तीन तासात हा इतिहास समाजापुढे न मांडता तब्बल आठ चित्रपट निर्माण करण्याचे उचललेले शिवधनुष्य उचलले आहे. हे खरोखरच नव्या पिढीला प्रेरणादायी आहे, असे मत राजमाता श्रीमंत छत्रपती कल्पनाराजे भोसले व्यक्त केले.
दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित ‘शेर शिवराज’ या मराठी चित्रपटाच्या ऐतिहासिक पोस्टरचा उद्घाटन सोहळा सातारा येथील जलमंदिर पॅलेसमध्ये मान्यवर निमंत्रितांच्या उपस्थितीत नुकताच पार पडला, याप्रसंगी त्या बोलत होत्या. या कार्यक्रमास ‘शेर शिवराज’ या चित्रपटात छ. शिवाजी महाराजांची भूमिका करणारे सुप्रसिद्ध मराठी अभिनेता चिन्मय मांडलेकर, पावनखिंडमधील बाजीप्रभू देशपांडे यांची भूमिका करणारे अजय पुरकर, समीर धर्माधिकारी, विक्रम गायकवाड यांचे सोबत चित्रपट निर्माते प्रद्योत पेंढारकर आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
‘शेर शिवराज’ हा मराठी चित्रपट येत्या 22 एप्रिल 2022 रोजी प्रदर्शित केला जात आहे. त्यापूर्वी शिवछत्रपतींचा इतिहास आणि त्यासाठी आम्हाला हवी असलेली शाबासकीची थाप खुद्द राजमाता श्रीमंत छत्रपती कल्पनाराजे भोसले यांनी या कार्यक्रमातून दिली हे खरोखरच आम्हा सर्वांचे भाग्य आहे. आजपर्यंत तीन चित्रपटांची निर्मिती केल्यानंतर शेर शिवराज व त्यापुढे आणखीन चार चित्रपट निर्माण करण्याचे शिवराज अष्टक हे आठ चित्रपटांचे संकल्पित काम राजमाता यांच्या आशीर्वादाने निश्चित पूर्ण होईल, असे यावेळी दिग्पाल लांजेकर यांनी बोलताना सांगितले.
यावेळी सर्व मान्यवर कलाकारांचा सत्कार शाल व पुष्पगुच्छ देऊन राजमाता यांच्या हस्ते करण्यात आला. शेर शिवराज चित्रपट कलाकारांच्या वतीने ही राजमाता यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा शुभम घटनेतून बनविलेला आकर्षक जिरेटोप स्मृतिचिन्ह म्हणून भेट देण्यात आला. याप्रसंगी सातारा जिल्हा परिषद शिक्षण समिती माजी सभापती सुनील काटकर, नगरपालिका शिक्षण मंडळाचे माजी सभापती वसंत शेठ जोशी, चित्रपट अभिनेते आणि नृत्य दिग्दर्शक पंकज चव्हाण (सातारा सांस्कृतिक बीजेपी प्रकोष्ट प्रदेश उपाध्यक्ष), पत्रकार दीपक प्रभावळकर, अतुल देशपांडे, अभिजीत भोसले, सौरभ सुपेकर, सह्याद्री प्रतिष्ठानचे प्रदीप गोजमगुंडे, रोहित सावंत आदी मान्यवरही यावेळी उपस्थित होते.
चौकट
‘पावनखिंड’ हा चित्रपट पाहिल्यानंतर छत्रपती उदयनराजे यांनी राजमाता कल्पनाराजे भोसले यांना हा चित्रपट पाहण्यासाठी आग्रह केला. हा चित्रपट पाहिल्यानंतर राजमाता कल्पनाराजे भोसले यांच्या डोळयासमोर समग्र इतिहास उभा राहत तो अभिमानाने जागृत झाला. ‘शेर शिवराज’ चित्रपटाला मनापासून शुभेच्छा देत त्यांनी कलाकारांचे भरभरून कौतुक केले. चित्रपटाच्या चित्रीकरणाचे अनुभवही कलाकारांकडून जाणून घेतले.









