ऑनलाईन टीम / मुंबई
बंगळुरु शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केल्याने सर्व मराठी जनतेमध्ये रोष पसरला आहे. कर्नाटकातील या घटनेचे महाराष्ट्रात पडसाद उमटल्याचं पाहायला मिळत आहे. कोल्हापूरात ही शिवसैनिक रस्त्यावर उतरले होते. तसेच दुसरीकडे बेळगावतही महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. याच पार्श्वभुमीवर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही या घटनेचा तीव्र शब्दात निषेध नोंदवला आहे. तसेच शिवारायांची विटंबना करणाऱ्यांना ज्यांनी संरक्षण दिले त्यांना देश माफ करणार नाही असे ही ते यावेळी म्हणाले.
यावर बोलताना “छत्रपती शिवाजी महाराजांची थोरवी अशा कुठल्याच घटनेने जराही कमी होणार नाही, मात्र अशा घटनांना संरक्षण देणाऱ्यांना देश माफ करणार नाही,” असं मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केलं.तसेच “छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत, देशाची अस्मिता आहेत. सर्वपक्षीय राज्यकर्त्यांसाठी आदर्श आहेत. कर्नाटकातील बंगळुरु शहरात त्यांच्या पुतळ्याची विटंबना करण्याचा प्रकाराचा मी अत्यंत तीव्र शब्दात निषेध करतो.” असे ते यावेळी म्हणाले.
“संपूर्ण भारताचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची काही समाजकंटकांनी बंगळूर येथे विटंबना केल्याचे समजले. हा प्रकार अत्यंत संताप आणणारा आहे. मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे या घटनेचा तीव्र निषेध करतो.” असे ही ते यावेळी म्हणाले.