लॉकडाऊनचा नगरपालिकेने घेतला असाही फायदा; दीड महिन्यात वाढवले गवत
देवदास मुळे/ कराड
लॉकडाऊनपूर्वी कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी 15 मार्चलाच शहरातील सार्वजनिक बागा, छत्रपती शिवाजी स्टेडियम बंद करण्याचा निर्णय शासनाच्या आदेशानुसार नगरपालिकेने घेतला. त्यामुळे शिवाजी स्टेडियमवरील खेळाडूंची वर्दळ थांबली. त्यानंतर नगरपालिकेने स्टेडियमवरील आऊट फिल्ड वाढवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे दोन महिन्यांच्या परिश्रमांनंतर शिवाजी स्टेडियमची आऊट फिल्ड हिरवीगार झाली आहे. गेल्या 10 ते 15 वर्षांनंतर अशी आऊटफिल्ड पाहून नागरिक सुखावले आहेत.
स्वर्गीय पी. डी. पाटील यांनी नगराध्यक्ष असताना त्यावेळच्या गावाच्या बाहेर छत्रपती शिवाजी स्टेडियमची उभारणी केली. 1973 मध्ये याचे उद्घाटन क्रिकेटमहर्षी डी. बी. देवधर व चंदू बोर्डे यांच्या हस्ते झाले. तालुकास्तरावर असणारे हे स्टेडियम राज्यात ओळखले जाते. यापूर्वी येथे रणजीचे सामनेही झाले आहेत. दिग्गज खेळाडूंनीही येथे भेटी दिल्या आहेत. स्वर्गीय पी. डी. पाटील यांच्या नगराध्यक्ष पदाच्या काळात व त्यानंतर रणजी सामन्यांचे आयोजन झाल्यानंतर संपूर्ण स्टेडियमवर गवत वाढवण्यात येत होते. मात्र अलिकडे क्रिकेट, फुटबॉल या खेळांमुळे आऊट फिल्ड तयार करण्यात अडचणी येऊ लागल्या. आऊटफिल्डसाठी स्टेडियमवर सातत्याने पाणी मारावे लागते. त्यासाठी स्प्रिंकलर बसवण्यात आले आहेत. मात्र व्यायामासाठी येणारे नागरिक, खेळाडू यांचा त्यास विरोध होत होता. त्यामुळे केवळ लाल मातीचे ग्राऊंड दिसत होते.
15 मार्चला स्टेडियम बंद केल्यानंतर मुख्याधिकारी यशवंत डांगे यांनी स्टेडियमवर गवत वाढवण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार अभियंता ए. आर. पवार यांच्या मार्गदर्शनाखाली रोज सकाळी 6 व सायंकाळी 4 असे 10 कर्मचारी रोज स्टेडियमवर काम करू लागले. सकाळी नऊपासून सायंकाळपर्यंत पाणी सोडण्यात येत होते. वर्दळ नसल्याने यास विरोध व्हायचा प्रश्नच नव्हता. त्यातच नगरपालिकेने कंपोस्ट खत निर्मिती सुरू केली आहे. या खतासह युरियाची मात्रा देण्यात आली. त्यामुळे जोमाने आऊट फिल्ड वाढली. सध्या स्टेडियम हिरवेगार झाले असून जोमाने गवत वाढले आहे. आता त्याचे कटींग करण्यात येणार आहे. मध्यंतरी कार्यक्रमांमुळे काही ठिकाणी नुकसान झाले होते. त्याची दुरूस्ती करण्यात येत आहे. कटिंग करण्यात आल्यानंतर पुन्हा खताची मात्रा देण्यात येणार आहे, अभियंता ए. आर. पवार यांनी सांगितले.
सध्या कडक उन्हाळा असतानाही शिवाजी स्टेडियमवर फुललेली हिरवाई पाहून नागरिक सुखावले आहेत. या हिरवाईचे फोटो सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत.
हिरवाई जपण्यासाठी प्रयत्न करू-मुख्याधिकारी यशवंत डांगे 16 केआरडी 17
शिवाजी स्टेडियमची आऊट फिल्ड प्रयत्नपूर्वक वाढवण्यात आली आहे. सध्या स्टेडियमवर खेळाडू येत नाहीत. त्यामुळे ती चांगली आहे. मात्र लॉकडाऊननंतर स्टेडियमवर वर्दळ वाढल्यानंतरही आऊटफिल्ड चांगली ठेवण्यासाठी प्रयत्न केले जातील.








