प्रतिनिधी / कोल्हापूर
शिवाजी विद्यापीठ अंतर्गत अधिविभागांची सुधारीत प्रवेश फेरी जाहीर करण्यात आली आहे. अंतिम सुधारीत गुणवत्ता यादी तयार करण्याचे काम 4 ऑक्टोंबरपर्यंत सुरू राहणार आहे. पहिल्या फेरीतील अधिविभागांच्या जागा 6 ऑक्टोंबर रोजी जाहीर होणार आहेत. सर्व अधिविभागांतील विद्यार्थ्यांनी 7 ऑक्टोंबर रोजी प्रत्यक्ष प्रवेश घ्यावयाचे आहेत. रसायनशास्त्र अधिविभागांतील प्रत्यक्ष प्रवेश 7 ते 9 ऑक्टोंबर या कालावधीत घ्यावयाचे आहेत. दुसऱया फेरीतील जागा 11 ऑक्टोंबर रोजी जाहीर करण्यात येणार आहेत.
तर दुसऱया फेरीतील विद्यार्थ्यांनी 12 ऑक्टोंबर रोजी प्रत्यक्ष प्रवेश घ्यावयाचे आहेत. अधिविभागातील प्रवेशावेळी विद्यार्थ्यांनी प्रवेश शुल्क ऑनलाईन भरावयाचे आहे. विद्यार्थ्यांनी ओळखपत्र, गुणपत्रक, कागदपत्रांच्या मूळ प्रती, साक्षांकीत तीन प्रती घेवून यावयाचे आहे. राखीव संवर्गातील विद्यार्थ्यांनी जातीचे प्रमाणपत्र, नॉनक्रिमिलियर सर्टिफिकेट (अनुसुचित जाती व अनुसुचित जमाती प्रवर्ग वगळून) घेवून येणे. कोरोनाच्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. तरी सुधारीत वेळापत्रकाप्रमाणे विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा, असे आवाहन विद्यापीठ प्रशासनाने केले आहे.