संग्राम काटकर / कोल्हापूर
एकेकाळी दैनंदिन कामासाठी वापरल्या जाणाऱ्या सायकलकडे आता बदलेल्या काळात आरोग्य तंदुरूस्तीच्या दृष्टीने पाहिले जाऊ लागले आहे. स्नायूंच्या बळकटीसाठी सायकलिंग करणे हा एक उत्तम आणि प्रभावी व्यायाम प्रकार ठरला आहे. बदलत्या जीवनशैलीमुळे अनेकांना वाढलेले वजन कमी करण्याबरोबरच उत्तम आरोग्यासाठी सकाळी सायकलिंग करायचे आहे. त्याच्यासाठी आता महापालिकेच्या वतीने 4 किलो मीटरचा सायकल ट्रॅक केला जाणार आहे. त्यासाठी शिवाजी विद्यापीठसमोरील पोस्ट कार्यालय ते डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजी (डीओटी) आणि डीओटीसमोरील रस्ता ते पुन्हा पोस्ट ऑफीस हा रस्ता निवडला आहे.
या ट्रॅकसाठी नाविण्यपूर्ण योजनेअंतर्गत 28 लाख रूपये खर्चाचा तयार केलेला प्रस्ताव महापालिकेने दोन आठवड्यापूर्वी जिल्हा नियोजन समितीकडे दिला आहे. सायकल ट्रॅकसाठी नियोजन समितीकडून निधी मंजूर झाला की लगेचच सार्वजनिक बांधकाम विभागाशी (पीडब्ल्यूडी) संपर्क साधून शिवाजी विद्यापीठसमोरील रस्त्यावरील दोन्ही बाजूंच्या फुटपाथच्या आतील 6 ते 7 फुटांपर्यंतची जागा मनपा ताब्यात घेणार आहे. या जागेवर डांबरीकरणाचा ट्रॅक करण्यात येणार आहे.
या ट्रॅकवरून सायकलिंग करणाऱ्या लोकांना नजिकच्या रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या मोठ्या वाहनांचा धोका पोहचू नये म्हणून ट्रॅकला लोखंडी बॅरिकेटस् लावली जाणार आहेत. या ट्रॅकवर एक व्यायाम म्हणून सायकलिंग करणाऱ्या लोकांसोबत विविध सायकलिंग स्पर्धेसह जागतिक पातळीवरील वर्ल्ड आयर्न मॅन चॅम्पियनशीपमध्ये सहभागी होणाऱ्या सायकलपटूंनाही सराव करणे सोपे जाणार आहे. हा सराव पूर्णपणे सुरक्षित असणार आहे. दुसरे म्हणजे स्पर्धेच्या सरावासाठी रोज 20 ते 30 किलोमीटर सायकलिंग करण्यासाठी शहरापासूनच्या परिसरातील गावांकडे जावे लागणार नाही, असे महापालिकेचे शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी सांगितले.
रोज सायकलिंग केल्याने होणारे फायदे असे…
| फुफ्फुस आणि हृदयाची कार्यक्षमता सुधारते, चढतीवर 20 मिनिटे सायकलिंग केल्याने स्नायूंना बळकटी येते. वेगात सायकल चालवल्यास शरीरातील अधिकच्या कॅलरीज जळण्यास मदत होते, माणसाचा मूड नेहमी फ्रेश राहतो. वाढलेले वजन कमी होऊन रक्तदाब आणि मधुमेह नियंत्रणात राहतो. |
रोज 1 तास सायकलिंग करा…

गेल्या दोन दशकांपासून घरोघरी दुचाकी, चारचाकी गाड्या आल्या आणि सायकलींचा वापरच संपला. जवळच्या अंतरावरील कामांसाठीही गाडीचा वापर होत आहे. त्यामुळे माणसाचे वजन वाढण्याच्या काही कारणांपैकी गाडीचा वापर हेही एक कारण ठरले आहे. मग वजन घटविण्याबरोबरच उत्तम आरोग्यासाठी लोक सायकलिंग करू लागले. आजही शेकडो लोक रोज सकाळी पन्हाळा, शिवाजी विद्यापीठ, कळंबा, सानेगुरूजी वसाहत आणि फुलेवाडी या रोडवरून सायकलिंग करताना दिसतात. आता त्यांनी नियोजन करून रोज सकाळी किमान 1 तास सायकलिंग करणे आवश्यक आहे. असे केले तर शरीरातील पॅलरीज बर्न होऊन वाढलेले वजन कमी होईलच, शिवाय उत्तम आरोग्यही लाभले.
डॉ. सुनील पाटील ( शिवाजी पेठ, आठ नंबर शाळा)









