प्रतिनिधी / विटा
खानापूर हे ठिकाण प्राकृतिकदृष्ट्या अतिशय सोयीचे असून मध्यवर्ती आहे. कार्यक्षेत्रातील सर्वच गावांना आणि विद्यार्थ्यांना खानापूर सोयीचे आहे. सदर जागा सर्व सोयीनीयुक्त असलेने शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्राला खानापूर याच ठिकाणी मंजुरी देणेसाठी राज्य सरकारला सुचना करावी,अशी मागणी भाजपचे राज्य प्रवक्तेआमदार गोपीचंद पडळकर यांनी राज्यपाल भगतसिंग कोशारी यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
शिवाजी विद्यापीठाच्या उपकेंद्रासाठी तासगाव तालुक्यातील बस्तवडे येथे मंजूर झाल्याचे समजताच खानापूर तालुक्यात खळबळ माजली आहे. याबाबत घाटमाथ्यावर संताप व्यक्त होत आहे. याबाबत भाजपचे राज्य प्रवक्ते आणि आमदार गोपीचंद पडळकर यांनी थेट राजभवनवर धाव घेतली. राज्यपाल भगतसिंग कोशारी यांची भेट घेऊन राज्य सरकारला सूचना करण्याची मागणी आमदार पडळकर यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन राज्यपाल महोदयांना दिल्याचे आमदार पडळकर यांनी म्हटले आहे.
याबाबत आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे, शिवाजी विद्यापीठचे उपकेंद्र खानापूर येथे होण्याच्या दृष्टीने २०१३-१४ पासून प्रक्रिया सुरू आहे. महत्वाचे म्हणजे या विषयात सिनेट, मॅनेजमेंट, व्यवस्थापन समितीची शिफारस झाली आहे. २२ मे २०१४ रोजी या समितीच्या अध्यक्ष आणि सदस्य यांनी तत्कालीन जिल्हाधिकारी यांना भेटून खानापुर येथील सरकारी जागा उपकेंद्र प्रयोजनासाठी द्यावी, अशी शिफारस केली होती. हा विषय खानापूरसाठी निश्चित झालेनंतर आता नव्याने हे उपकेंद्र तासगाव तालुक्यातील बस्तवडे या ठिकाणी गेलेची चर्चा सुरू आहे.
खानापूर हे ठिकाण प्राकृतिकदृष्ट्या अतिशय सोयीचे असून सदर जागा ही राष्ट्रीय महामार्गावर आहे. या जागेशेजारीच खानापूर येथील बारमाही पाण्याचा तलाव आहे. हे ठिकाण मध्यवर्ती असलेने कार्यक्षेत्रातील सर्वच गावांना आणि विद्यार्थ्यांना सोयीचे आहे. सदर जागा सर्व सोयीनीयुक्त असलेने शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्राला खानापूर याच ठिकाणी मंजुरी देणेसाठी राज्य सरकारला सुचना करावी, अशी मागणी आमदार पडळकर यांनी राज्यपाल भगतसिंग कोशारी यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.








