सुधीर मुनगंटीवार यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
मुंबई / प्रतिनिधी
छत्रपती शिवाजी महाराज यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी तुलना करणाऱया ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ या पुस्तकावरुन वाद चांगलाच चिघळलेला असताना राज्याचे माजी अर्थमंत्री आणि भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी शिवाजी महाराजांशी काही नेत्यांची तुलना करण्यात आलेल्या पुस्तकांवर बंदी घालण्याचीही मागणी मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंकडे पत्राद्वारे केली आहे. महाराष्ट्रातील काही नेत्यांची तुलना, बरोबरी ही छत्रपती शिवाजी महाराजांशी काही पुस्तकांच्या माध्यमातून करण्यात आली आहे. अशी अनेक पुस्तके असून हा महाराष्ट्रातील तमाम शिवभक्तांचा अवमान असून कोणत्याही व्यक्तीची तुलना ही शिवाजी महाराजांशी होऊ शकत नाही. अशा पध्दतीच्या सर्व पुस्तकांवर तातडीने बंदी घालण्यात यावी. तसेच या संबंधीचा शासन निर्णय त्वरीत निर्गमित करावा, अशी विनंती मुनगंटीवार यांनी केली.
तसेच काही हॉटेल्स आणि बिअर बारला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्यात आले आहे. यावर बंदी घालणारा शासन निर्णयही तातडीने काढावा, असे मुनगंटीवार म्हणाले. याबाबत आपण आठ दिवसात निर्णय घेणे अपेक्षित असल्याचे मुनगंटीवार यांनी बोलताना अन्यथा महाराष्ट्रातील सर्व शिवभक्त जनता योग्य तो निर्णय घेईल, असेही त्यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.
छत्रपतींचा अपमान भाजप सहन करणार नाही : चंद्रकांत पाटील
श्रीमंत छत्रपती उदयनराजे यांच्याकडे छत्रपती शिवाजी महाराजांचा वंशज असल्याचा पुरावा मागणाऱया शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शिवाजी महाराजांचे घराणे आणि सातारच्या गादीचा अपमान केला आहे. राऊत यांच्या या मस्तवाल विधानाचा आपण निषेध करतो. छत्रपतींच्या घराण्याचा हा अपमान भाजप आणि महाराष्ट्रातील शिवप्रेमी जनता सहन करणार नाही, असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी सांगितले. शिवसेनेला आता छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेण्याचा नैतिक अधिकार उरला नसून या अपमानाबद्दल शिवसेनेने माफी मागितली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.









