मार्केट पोलीस स्थानकात एफआयआर
प्रतिनिधी/ बेळगाव
क्षुल्लक कारणावरुन एका तरुणावर चाकुहल्ला करण्यात आला आहे. रविवारी रात्री 10.30 वाजण्याच्या सुमारास शिवाजीनगर येथे ही घटना घडली असून मार्केट पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे.
गौरव प्रदीप नेसरीकर (वय 22, रा. शिवाजीनगर) असे जखमी तरुणाचे नाव असून त्याच्यावर उपचार करण्यात येत आहेत. त्याच परिसरातील स्वप्नील उर्फ डॉन याने क्षुल्लक कारणावरून गौरववर चाकुहल्ला केल्याचे पोलिसांनी सांगितले. यासंबंधी भा.दं.वि. 307, 504, 341 कलमान्वये एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
रविवारी रात्री गौरव हा शिवाजीनगर, तिसऱया क्रॉसवरील राज मेडीकलजवळ जात असताना त्याला अडवून स्वप्नीलने त्याच्याशी भांडण काढले. भांडणानंतर त्याचा खून करण्याच्या उद्देशाने त्याच्यावर चाकुहल्ला केल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलीस निरीक्षक संगमेश शिवयोगी पुढील तपास करीत आहेत.









