एनडीए विस्कटली, भाजपापुरतीच ‘एनडीए’ राहील : राणेंकडून विकासकामांच्या नावाखाली लुबाडण्याचे काम – राऊत
प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:
खासदार नारायणे राणे यांनी आपल्या मेडिकल कॉलेजच्या उद्घाटनाला शिवसेनेवर तोंडसुख घेण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना बोलावले होते, अशी जोरदार टीका शिवसेना सचिव, खासदार विनायक राऊत यांनी सोमवारी तळगाव येथे पत्रकार परिषदेत बोलताना केली. संपूर्ण भाषणात शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशिवाय त्यांना दुसरा विषय सापडला नाही. यातच शिवसेनेचे मोठे यश असल्याचे ते म्हणाले.
नारायण राणे यांच्या पडवे येथील मेडिकल कॉलेजच्या उद्घाटनासाठी आलेले अमित शाह व विधानसभेतील विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात शिवसेनेवर टीका केली होती. त्याला खासदार विनायक राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले.
तळगाव येथील निवासस्थानी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलताना म्हणाले, केंद्रीय गृहमंत्री जिल्हय़ात आले म्हटल्यावर सिंधुदुर्ग जिल्हय़ासाठी किंवा महाराष्ट्रासाठी काहीतरी जाहीर करतील, अशी आशा येथील जनतेला होती. केंद्र सरकारकडून जीएसटीची 27 हजार कोटींची रक्कम महाराष्ट्राला येणे बाकी आहे. आपत्ती निवारणासाठी हजारो कोटींची मागणी केंद्र सरकारकडे प्रलंबित आहे. त्यावर काही भाष्य न करता शाह यांनी फक्त शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करून तोंडसुख घेतले. केंद्रीय गृहमंत्र्यांना शिवसेनेवर तोंडसुख घेण्याची वेळ आली, हेच उद्धव ठाकरे यांचे यश आहे.
युती तुटल्याचे दुःख नाही!
विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना-भाजप युती तुटली असली, तरी त्याचे दु:ख नाही. कारण निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्रीपद देण्याचा शब्द त्यांनी पाळला नाही. खरं तर वापरायचं आणि फेकून द्यायचं, ही भाजपची ख्याती आहे. अटलबिहारी वाजपेयी आणि प्रमोद महाजन असताना त्यांनी 36 पक्ष एकत्रित करीत एनडीएची स्थापना केली. परंतु आजची परिस्थिती बघितली, तर एनडीए विस्कटलेली आहे. फक्त भाजपापुरते ‘एनडीए’ राहिले आहे. सर्व पक्ष सोडून गेले. अकाली दलाने मंत्रीपदावर पाणी सोडत एनडीए सोडले. लालकृष्ण आडवाणींसारख्या ज्ये÷ नेत्याला अडगळीत टाकलं गेलं. राजनाथसिंह यांनाही किंमत दिली जात नाही. त्यामुळे फक्त अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी या दोघांचाच भाजप पक्ष राहिला आहे, असेही ते म्हणाले.
बंद खोलीत आम्ही वचन देत नाही, असे अमित शाह म्हणाले. परंतु ती बंद खोली त्यांच्यासाठी असेल. पण मातोश्री हे आमच्यासाठी दैवताचं मंदिर आहे. यापूर्वी या मातोश्रीमध्ये ज्या-ज्या चर्चा झाल्या, त्याचे साक्षीदार अटलबिहारी वाजपेयी, प्रमोद महाजन, लालकृष्ण आडवाणी आहेत. त्यातील लालकृष्ण आडवाणी आजही साक्षीदार आहेत. गोध्रा हत्याकांड प्रकरणात शिवेसनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या पाठिशी राहिले म्हणून ते आज दिसत आहेत, असे खासदार राऊत म्हणाले.
अमित शहा-नारायण राणे समविचारी!
सिंधुदुर्ग जिल्हय़ात नारायणे राणे यांनी कॉंग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनाही आणले होते. आता अमित शाह यांनाही आणले. राणे आणि शहा दोन्ही समविचारी एकत्र आले आहेत. त्यांनी ‘लाईफ टाईम’ राहावे, हीच इच्छा आहे, असे ते म्हणाले.
कोरोना काळात महाराष्ट्रामध्ये चांगलं काम!
कोरोना काळात महाराष्ट्रामध्ये सर्वात वाईट काम झाल्याची टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. त्यावर खासदार राऊत म्हणाले, कोरोना काळात महाराष्ट्रामध्ये चांगले काम झाले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने त्याचे कौतुकही केले आहे. मुंबई शहरात दोन कोटी लोकसंख्या आहे. तिथे दीड लाख लोकांचा कोरोनामुळे मृत्यू होईल, असा अंदाज व्यक्त केला गेला होता. परंतु 11 हजार लोकांचा कोरोनाने मृत्यू झाला. कोरोना नियंत्रणात फार मोठे यश महाराष्ट्र राज्याने मिळवले आहे. धारावी वस्तीमधील कोरोना नियंत्रण पॅटर्नचे कौतुक केले गेले. कोरोना आला, तेव्हा राज्यात दोन आरटीपीसीआर लॅब होत्या. त्या आज 500 पर्यंत झाल्या आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण महाराष्ट्रामध्ये सर्वात चांगले आहे. असे असताना केवळ राजकीय आकसापोटी टीका केली जाते, आहे राऊत म्हणाले.
विकासाच्या नावाखाली लुबाडण्याचे काम
शिवसेना विकासाला नेहमी विरोध करते, असा आरोप नारायण राणे नेहमी करतात, असे सांगत राऊत म्हणाले, राणे यांनी विकासाच्या नावाखाली फक्त लुबाडण्याचे काम केले. सी-वर्ल्डच्या नावाखाली त्या ठिकाणी जमिनी घेतल्या. हॉटेल उभारायची होती. 350 एकर जमिनीची गरज असताना 1300 एकर जमीन घेण्याचा घाट त्यांनी घातला आणि या सर्वाची माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच भांडाफोड केली, असेही ते म्हणाले. तसेच चिपी विमानतळाला आमचा विरोध आहे, असा आरोप केला जातो. पण विमानतळाला आमचा विरोध नव्हता. विरोध होता तो 937 हेक्टर जमिनीमध्ये कमर्शियल झोन लावून भूखंड हडप करण्याचा डाव होता, त्याला, असेही राऊत यांनी स्पष्ट केले.
1 मार्चपर्यंत विमानतळ कार्यान्वित होणार!
विमानतळाची खराब झालेली धावपट्टी आता दुरुस्त करून झाली आहे. त्याची टेस्टिंगही झाली आहे. त्यामुळे आयआरबी कंपनीकडूनच 1 मार्चला किंवा त्याआधी सुद्धा विमानतळ कार्यान्वित होईल. सकाळी 11 वाजता विमान येईल व दुपारी 2 वाजता मुंबईला परत जाईल. तसेच सुरत, अहमदाबाद येथेही जाण्यासाठी विमान सुरू होणार आहे. सद्यस्थितीत 2500 रुपये तिकीट असणार आहे, अशी माहिती खासदार राऊत यांनी दिली.









