जिल्हा रुग्णालय येथे जिल्हाप्रमुख संजय पडते यांच्या हस्ते उद्घाटन
प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:
कोरोना रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना मदत मिळावी, यासाठी जिल्हा रुग्णालय येथे सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेनेमार्फत जिल्हा रुग्णालय ओरोस येथे कोविड-19 मदत कक्ष सुरू करण्यात आला आहे. शिवसेना पदाधिकाऱयांच्या उपस्थित जिल्हाप्रमुख संजय पडते यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी त्यांनी शिवसेना रुग्णांच्या मदतीसाठी कायम तत्पर राहिल, असा विश्वासही व्यक्त केला.
सध्या सिंधुदुर्ग जिल्हय़ातील कोरोना पोझिटिव्ह रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यावेळी जिल्हा रुग्णालयातील कोविड पॉझिटिव्ह रुग्णांना जिल्हा रुग्णालयाकडून आवश्यकत्या सर्व वैद्यकीय सेवा देण्यात येत आहेत. परंतु पॉझिटिव्ह रुग्ण व नातेवाईक यांना काही अतिरिक्त अडचणी निर्माण होतात. त्यावेळी त्यांना माणुसकीच्या भावनेतून मदत होणे आवश्यक आहे. जिल्हय़ाचे खासदार विनायक राऊत पालकमंत्री उदय सामंत साहेब, आमदार वैभव नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा शिवसेना पुरस्कृत जिल्हा रुग्णालय ओरोस येथे कोविड-19 मदत कक्ष सुरु करण्यात आला.
या मदत कक्षाच्या माध्यमातून कोविड पॉझिटिव्ह रुग्ण व त्यांचे नातेवाईक यांना भेडसावणाऱया अतिरिक्त अडचणींच्या बाबतीत पूर्णत: मदत केली जाणार आहे. तसेच या कक्षाच्या माध्यमांतून रुग्णांची प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी अंडी, पपई, सफरचंद आदी दररोज रुग्णांना मोफत देण्यात येणार आहेत.
यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत, संदेश पारकर, माजी जि. प. अध्यक्ष विकास कुडाळकर, जि. प. गटनेते नागेंद्र परब, महिला जिल्हाप्रमुख जान्हवी सावंत, कुडाळ तालुका प्रमुख राजन नाईक, कणकवली तालुका प्रमुख शैलेश भोगले, जि. प. सदस्य अमरसेन सावंत, डॉ. प्रवीण सावंत, परशुराम परब तसेच शिवसेना विभागप्रमुख नागेश ओरोसकर आदी उपस्थित होते.









