प्रतिनिधी / कोल्हापूर
कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेनेने रणशिंग फुंकले आहे. मंगळवारी शिवसेनेचे संभाव्य उमेदवार जाहीर होणार आहेत. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष माजी आमदार राजेश क्षीरसागर आणि शहर प्रमुख रविकिरण इंगवले यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना निवडणूक रिंगणात उतरणार आहे.
महाविकास आघाडीतील शिवसेनेसह काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षांनी स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. या तिन्ही पक्षांसह विरोधी भाजप, ताराराणी आणि आम आदमी पार्टी हे पक्ष देखील निवडणूक रिंगणात असणार आहेत. सद्यःस्थितीत काँग्रेस पक्षाकडे सर्वाधिक इच्छुक उमेदवारांची पसंदी असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. त्यामुळे काँग्रेस नेते पालकमंत्री सतेज पाटील यांनी सावध भूमिका घेतली आहे. राष्ट्रवादीच्या जिंकू शकणाऱया वीस ते पंचवीस संभाव्य उमेदवारांच्या नावाची यादी तयार असल्याचे सांगितले जाते. मात्र राष्ट्रवादी नेते ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी देखील मौन बाळगले आहे. आम आदमी पार्टी शहरात रिक्षा फिरवून झाडूची चर्चा घडवून आणत आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेने संभाव्य उमेदवार जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे.
राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष, माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी सलग दोनवेळा कोल्हापूर उत्तरमधून शिवसेनेचे आमदार म्हणून प्रतिनिधीत्व केले आहे. क्षीरसागर आमदार असताना 2015 च्या सभागृहात शिवसेनेचे केवळ चारच नगरसेवक निवडून आले होते. या चारही नगरसेवकांना कार्यकाळ पूर्ण केलेल्या सभागृहात परिवहन समिती सभापतीपदासह इतर पदेही मिळाली. यंदाच्या निवडणुकीत शिवसेनेची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. राज्यात शिवसेना सत्तेत आहे. पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे कोल्हापूर महापालिकेत शिवसेनेचे जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्याचे शिवधनुष्य क्षीरसागर यांना पेलावे लागणार आहे. त्यांच्याबरोबर शहर प्रमुख रविकिरण इंगवले यांच्यावरीलही जबाबदारी वाढली आहे.
मातोश्रीची कोल्हापूर महापालिकेवर नजर
शिवसेनेचे पॉवर हाऊस असणाऱया `मातोश्री’ची नजर कोल्हापूर शिवसेनेवर आहे. शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार गेल्या काही दिवसांत शिवसेना नेत्यांचे कोल्हापूर दौरे सुरू आहेत. नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, कोल्हापूरचे संपर्क मंत्री तथा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, संपर्क प्रमुख अरूण दूधवडकर यांनी कोल्हापूरला भेट देऊन निधी देण्याबरोबरच उपक्रमही सुरू केले आहेत. शिवसेना नेतृत्वाने कोल्हापूर महापालिकेची निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. त्यामुळे राजेश क्षीरसागर यांचीही कसोटी लागणार आहे.









