जळगाव/प्रतिनिधी
विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष कोणत्या ना कोणत्या कारणावरून एकमेकांवर टीका करत असतात. पण जेव्हा तेच नेते एकत्र येतात तेव्हा मात्र चर्चेला उधाण येतं. असेच राज्यातील दोन विरोधी आणि सत्ताधारी पक्षातील नेते एकत्र गाडीतून फिरताना दिसले. त्यांनतर तर्क वितर्क लावण्यास सुरुवात झाली. दरम्यान, राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी आज अचानक भाजप नेते गिरीश महाजन यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली. यावेळी दोघांनीही एकत्रं अल्पोपहार घेतला. त्यानंतर दोघेही एकाच वाहनाने नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी गेले.
राज्य सरकार कोसळण्यावर भाजपकडून दावे केलेले जात असतानाच राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी गिरीश महाजन यांच्या घरी अचानक भेट दिल्याने तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. तसेच पाटील यांनी महाजन यांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेणं हा राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्यासाठी शह असल्याचंही बोललं जात आहे.
राज्यात काही ठिकाणी झाल्येल्या मुसळधार पावसामुळे जामनेर तालुक्यात शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे. गुलाबराव पाटील या पूरग्रस्त भागाची आज पाहणी करत आहेत. या पाहणीसाठी जामनेरमध्ये आले असता पाटील यांनी थेट गिरीश महाजन यांचे घर गाठले. यावेळी महाजन यांनीही पाटील यांचं हसतमुखाने स्वागत केलं. पाटील यांनी महाजन यांच्या घरातील गणपती बाप्पाचं दर्शन घेतल्यानंतर दोघांनीही एकत्रं अल्पोपहार घेतला. त्यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये गप्पाही झाल्या. त्यानंतर दोन्ही नेते एकाच वाहनाने जामनेर तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी पुढे गेले. राज्यातील महाविकास आघाडी सरकार कधीही कोसळेल, असा दावा भाजपकडून सातत्याने केला जात असताना आज गुलाबराव पाटील व गिरीश महाजन यांची जाहीर भेट झाल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या.








