ऑनलाईन टीम / नाशिक :
शिवसेना खासदार हेमंत गोडसे यांना कोरोनाची बाधा झाली आहे. स्वतः गोडसे यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली.

ते आपल्या ट्विटमध्ये म्हणाले की, माझ्या कोरोना चाचणीचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे. मागील काही दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या सर्व व्यक्तींनी व सहकाऱ्यांनी काळजी म्हणून वैद्यकिय सल्ल्याने गरज असल्यास स्वतःची कोरोना चाचणी करावी. तसेच मी यथाशक्य माझ्या ठिकाणाहून आपली सेवा सुरू ठेवेन,व कोरोना परिस्थितीचा आढावा घेत राहीन, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
पुढे ते म्हणाले, आता कोरोनासोबत जगणे स्वीकारले पाहिजे. गेल्या अनेक दिवसांपासून आपल्या जिल्ह्याचा कोरोनाचा आलेख वाढत असताना मतदारसंघातील विकास कामे, शासकीय बैठका तसेच मतदारसंघातील विविध ठिकाणी भेटी देणे गरजेचे असल्याने माझे काम सुरु होते. असे त्यांनी आपल्या ट्विट मध्ये म्हटले आहे.
हेमंत गोडसे 2014 पासून शिवसेनेच्या तिकिटावर सलग दुसऱ्यांदा खासदारपदी निवडून आले आहेत. त्यापूर्वी त्यांनी नाशिक जिल्हा परिषद, नाशिक महापालिका यातही पदे भूषवली आहेत.









