ऑनलाईन टीम / परभणी :
परभणीचे शिवसेना खासदार संजय जाधव यांना जीवे मारण्यासाठी सुपारी देण्यात आली आहे. स्वतः संजय जाधव यांनी याबाबत पोलिसात तक्रार दाखल केली आहे. तब्बल दोन कोटी रुपयांची सुपारी दिल्याची तक्रार खासदार संजय जाधव यांनी काल रात्री उशिराने परभणीच्या नानलपेठ पोलिस ठाण्यात दिली आहे. त्यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. अद्यापही या प्रकरणी कोणताही गुन्हा दाखल करण्यात आला नाही आहे.
खासदार संजय जाधव यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, नांदेड येथील रिंदा गॅंगला तब्बल दोन कोटी रुपये देऊन त्यांना संपवण्याचा कट रचण्यात आला आहे. यासाठी परभणीतील एका बड्या व्यक्तीने हे दोन कोटी रुपये देऊन त्यांची सुपारी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. नांदेड रिंदा गॅंग ही पंजाबवरून ऑपरेट करण्यात येते.
या तक्रारीच्या अनुषंगाने परभणीचे पोलीस अधीक्षक जयकुमार मीना यांनी या प्रकरणी चौकशी समिती नेमली आहे. ही चौकशी समिती या तक्रारीची पूर्ण माहिती घेऊन त्यानंतर या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात येणार आहे, असे नानलपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कुंदनकुमार वाघमारे यांनी सांगितले आहे.








