ऑनलाईन टीम
शिवसेना खासदार भावना गवळी यांची सध्या ईडीकडून बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी चौकशी सुरू आहे. गेल्या महिन्यात २७ सप्टेंबरला ईडीनं भावना गवळी यांना समन्स बजावलं होतं. त्यांचे निकटवर्तीय सईद खान यांना देखील ईडीकडून अटक करण्यात आली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा भावना गवळी यांना ईडीनं समन्स बजावलं आहे. येत्या २० ऑक्टोबरला गवळी यांना ईडीनं चौकशीसाठी हजर राहण्यासाठी समन्स बजावले आहे. महिला उत्कर्ष प्रतिष्ठानमध्ये झालेल्या कथित घोटाळ्यासंदर्भात ही चौकशी सुरू आहे.
वाशीम जिल्हय़ातील महामार्गाच्या कामामध्ये शिवसैनिक आडकाठी आणत असल्याची तक्रार केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे केली होती. त्यानंतर गवळी यांनी १०० कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप सोमय्या यांनी केला. “भावना गवळींनी ५५ कोटींचा बालाजी पार्टीकल बोर्ड हा कारखाना २५ लाख रुपयात घेतला. सन २०१९ मध्ये रिसोड येथील जनशिक्षण संस्था व महिला उत्कर्ष प्रतिष्ठानच्या कार्यालयातून ७ कोटी रुपये चोरून नेल्याची तक्रार गवळी यांनी केली होती. ७ जुलै २०१९ रोजीच्या चोरीची तक्रार १२ मे २०२० रोजी करण्यात आली. १० महिने उशिरा तक्रार देण्याचे कारण काय? त्या कार्यालयात ७ कोटी कुठून आले?” असे सवाल सोमय्या यांनी केले होते.