ऑनलाईन टीम / बुलढाणा :
विविध कारणांनी कायम चर्चेत राहणारे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्या घरासमोर त्यांची 4 चाकी महागडी गाडी पेटवून देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या घटनेमुळे बुलडाण्यात खळबळ उडाली आहे. ही घटना पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, संजय गायकवाड यांनी नेहमी प्रमाणे आपली गाडी इनोव्हा कार घरासमोर उभी केली होती. मध्यरात्री अंधाराचा फायदा घेऊन अज्ञात व्यक्तींनी पेटवून देण्याचा प्रयत्न केला. या आगीत गाडीच्या मागील भागाने नुकसान झाले आहे. वाहन जाळण्यापूर्वी आरोपींनी परिसरातील वीज पुरवठा खंडीत केला होता.
ही घटना घडली तेव्हा संजय गायकवाड हे घरी नव्हते. कामानिमिताने संजय गायकवाड हे मुंबईला गेले होते. याच संधीचा फायदा घेत अज्ञातांनी गाडी जाळण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान, हा पूर्वनियोजित कट होता, असा आरोप संजय गायकवाड यांनी केला आहे. राजकीय वादातून हा हल्ला करण्याचा प्रयत्न असावा असा संशय देखील त्यांनी व्यक्त केला आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतील. डॉग स्कॉडला देखील पाचारण करण्यात आले आहे. या प्रकरणाचा पोलीस कसून तपास करत आहेत.