कन्नड रक्षक वेदिकाचा ध्वज हटवा : शिरोळकर यांच्या हल्लेखोरांना पकडा : भगव्याला विरोध तर लाल-पिवळा तरी कशाला ?
प्रतिनिधी / सातारा
कन्नड रक्षक वेदिका संघटनेने बेळगाव महापालिकेसमोर बेकायदेशीरपणे लाल-पिवळा ध्वज लावला आहे. शिवसेनेचा भगवा ध्वज कर्नाटक सरकारला चालत नाही. शिवसेनेवर गुन्हे दाखल करत आहात. तर मग बेळगावमध्ये कन्नड रक्षक वेदिका संघटनेचा ध्वज आम्ही देखील खपवून घेणार नाही, असा सज्जड दम देत शिवसेनेचे सातारा जिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव यांनी मराठी माणसांच्या काळजावर रोवलेला कन्नड रक्षक वेदिका संघटनाचा लाल, पिवळा ध्वज हटवा अन्यथा दि. 20 मार्च 2021 रोजी सातारा-सांगली-कोल्हापूर या जिह्यातील कन्नड व्यावसायिकांचे व्यवहार बंद केले जातील, असा इशारा दिला आहे.
सीमाभागात बेळगाव शहरातील महानगरपालिकेसमोर बेकायदेशीरपणे उभा केलेला कन्नड रक्षक वेदिका संघटनेचा लाल पिवळा ध्वज यावर आक्षेप नोंदवण्यासाठी जिल्हा प्रमुख चंद्रकांत जाधव यांनी महेंद्र एकिझक्युटिव्ह हॉटेलमध्ये पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी जिल्हाप्रमुख यशवंत घाडगे, युवा सेनेचे जिल्हा प्रमुख रणजितसिंह मोहिते, उपजिल्हाप्रमुख संजय भोसले, सचिन मोहिते, माजी जिल्हा प्रमुख संजय मोहिते, माजी उपजिल्हाप्रमुख महेश शिंदे, तालुका प्रमुख दत्ता नलवडे, सचिन झांजुर्णे, युवराज पाटील तसेच शिवसैनिक उपस्थित होते.
यावेळी बोलताना चंद्रकांत जाधव यांनी कन्नड रक्षक वेदिका संघटनेने बेळगाव महानगरपालिकेसमोर लावलेल्या ध्वजाच्या घटनेचा कडक शब्दात निषेध केला. हा ध्वज बेकायदेशीरपणे उभा केला असून त्यास महाराष्ट्र एकीकरण समिती व शिवसेनेने आक्षेप घेवून हा लाल पिवळा ध्वज हटवण्याची मागणी केली आहे. याच मागणीसाठी समिती व शिवसेनेने मोर्चा काढण्याची परवानगी मागितली असता बेळगाव प्रशासनाने परवानगी नाकारत शिनोळी येथे मोर्चा अडवला मात्र शिवसेनेने कोतेवाडी, जि. बेळगाव येथे भगवा फडकवला.
त्यामुळे चिडलेल्या जिल्हा पोलीस अधिक्षक आमटे यांनी शिवसेनेच्या कोल्हापूर जिल्हा प्रमुख विजय देवणे, संजय पवार व इतर पदाधिकाऱयांवर भगवा फडकवला म्हणून भाषिक तेढ निर्माण केल्याचा गुन्हा काकती पोलीस ठाण्यात दाखल केला आहे. तसेच महाराष्ट्र एकीकरण समितीच्या 8 मार्च रोजीच्या मोर्चास कोल्हापूर जिल्हा शिवसेना सहभागी होवू नये म्हणून विजय देवणे यांना बेळगाव जिल्हाबंदीचा आदेश काढण्यात आला. ही एक प्रकारची प्रचंड दडपशाही असून त्याला उत्तर देण्यासाठी शिवसेना सज्ज झाली असल्याचे जाधव यांनी यावेळी सांगितले.
ते पुढे म्हणाले, दि. 12 मार्च रोजी बेळगावचे शिवसेना जिल्हाप्रमुख प्रकाश शिरोळकर यांच्या गाडीवर कन्नड रक्षक वेदीका संघटनेने हल्ला केला. हा सर्व घटनाक्रम पाहता कोल्हापूर जिल्हा शिवसेनेने दि. 12 मार्च 2021 पासून कर्नाटक एस टी व भाडोत्री वाहन यांना महाराष्ट्र बंद केले आहे. अजूनही कन्नड रक्षक वेदिका संघटना मराठी भाषिकांसोबत अन्यायी वागणूक करत आहे. यास बेळगाव जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासन पाठीशी घालत आहेत हे आता आम्ही मुळीच खपवून घेणार नाही. यापुढे शिवसेना जशास तसे उत्तर देण्यास सिध्द झाली असल्याचे जाधव यांनी सांगितले.
पश्चिम महाराष्ट्रातील कन्नड उद्योजकांवर बहिष्कार
बेळगाव शिवसेना जिल्हाप्रमुख प्रकाश शिरोळकर यांच्यावर हल्ला करणाऱया हल्लेखोरांना अटक झाली नाही. लाल- पिवळा ध्वज काढलेला नाही. शिवसेनेचा याविरोधी संघर्ष सुरु असून आता आम्ही थांबणार नाही. बेळगाव महानगरपालिकेसमोरील लाल पिवळा ध्वज त्वरित हटवा अन्यथा शनिवार दि. 20 मार्चपासून कोल्हापूर, सांगली, साताऱयासह पश्चिम महाराष्ट्रातील कन्नड उद्योजकांचे सर्व व्यवहार बंद करण्याचा सज्जड इशारा चंद्रकांत जाधव यांनी दिला.









