बेळगांव येथील स्पर्धेत अव्वल कामगिरी : महाराष्ट्रातही ‘शिवसंस्कृती’च ठरले अव्वल
अजय बागकर /उसगांव
उसगांव येथील शिवसंस्कृती प्रतिष्ठानच्या ढोल-ताशा पथकाने महाराष्ट्र राज्यानंतर आता कर्नाटकातही विजयी पताका फडकावली आहे. आपल्या दमदार सादरीकरणाने बेळगांवातील प्रेक्षकांची मने जिंकत या वादन क्षेत्रात आपला डंका कायम राखला आहे.
बेळगांव येथील सरदार मैदानावर आमदार अनिल बेनके यांनी 7, 8 व 9 ऑक्टोबर रोजी दसरा क्रीडा आणि सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन केले होते. यानिमित्त भव्य ढोल-ताशा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यात एकूण 21 ढोल ताशा पथकांमधून शिवसंस्कृती प्रतिष्ठानने अव्वल कामगिरी करीत प्रथम क्रमांकाचे रु. 1,11,111 रोख पारितोषिक व मानाचा चषक पटकावला.
या स्पर्धेत रु. 75,000 चे द्वितीय पारितोषिक आरंभ ढोल ताशा पथक बेळगाव यांना तर रु. 51,000 चे तृतीय पारितोषिक शिवगर्जना ढोल ताशा पथक बेळगाव यांना मिळाले. चौथे पारितोषिक मोरया ढोल ताशा पथक बेळगाव व पाचवे वैजनाथ ढोल ताशा बेळगाव यांना प्राप्त झाले.
उत्कृष्ट ढोल वादनö उपासना अशोक देसाई (शिवसंस्कृती, गोवा) परीक्षकांच्या शिफारशीनुसार उत्कृष्ट ढोल वादन- अन्नू दिलीप धुरी (शिवसंस्कृती गोवा), उत्कृष्ट ताशा वादन अनिरुद्ध (शिवगर्जना बेळगाव), ध्वज- जान्हवी मुळे, प्रतिक मोरे (बेळगांव) यांना वैयक्तिक पारितोषिके देण्यात आली.
उसगांवचे नाव उज्ज्वल करणे हाच ध्यास – नरेश नाईक
बेळगावातील या कागिरीबद्दल बोलताना, शिवसंस्कृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष नरेश नाईक म्हणाले, ढोल ताशाच्या माध्यमातून उसगावचे नाव उज्ज्वल व्हावे हा आपला ध्यास आहे. महाराष्ट्रात कागल व जयसिंगपूर येथे झालेल्या स्पर्धांमध्ये प्रथम पारितोषिक प्राप्त झाल्याने बेळगांव येथे होणाऱया स्पर्धेत प्रेक्षकांची अपेक्षा मोठी होती. या परीक्षेतही आम्ही अव्वल ठरलो. प्रेक्षकांबरोबरच परीक्षकांनीही चांगली दाद दिली. उसगावचे ग्रामस्थ, समिती सदस्य व ज्या कलाकारामुळे हे यश प्राप्त झाले या सर्वांचे त्यांनी अभिनंदन केले आहे. कलेचा वारसा युवा पिढीकडे प्रवाहित व्हावा यासाठी पालवाडा, धावशिरे, धाटवाडा व ताकवाडा येथे भजनवर्ग सुरु करण्यात आले आहेत.
वेगळेपण व स्वतंत्रशैलीमुळे यश प्राप्ती – प्रद्युम्न च्यारी
या पथकाचे मुख्य प्रशिक्षक प्रद्युम्न कृष्णनाथ च्यारी यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना, कोणाचीही नक्कल न करता स्वतंत्र्यरित्या आपली वेगळी चाल व बोल, कलाकारांची मेहनत, इतरांपेक्षा वेगळे सादरीकरण, वादनातील अचुकता यामुळे हे यश प्राप्त झाल्याचे सांगितले. महाराष्ट्र व कर्नाटकात यश प्राप्तीमुळे आता जबाबदारी वाढली असून त्यातील बारकावे व नाविन्याचा शोध घेण्याचे कार्य सुरुच राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
युवा वादक कलाकारांनी पुढे यावे – जयेश गावडे
या पथकातील ताशा प्रशिक्षक जयेश मोर्तू गावडे म्हणाले, युवा कलाकारांनी ताशा प्रशिक्षणासाठी पुढे यावे. स्पर्धांमुळे आपण सर्वोत्कृष्ट देण्याचा प्रयत्न करतो. गुरुप्रती आदर भावना बाळगून प्रत्येकाने शिस्त बाळगणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
चित्रपटात संधी देऊ – परीक्षक प्रथमेश धुमाळ
परीक्षक मंडळातील एक प्रसिद्ध संगीतकार प्रथमेश धुमाळ यांनी मुक्त कंठाने या पथकाची प्रशंसा केली. या प्रदर्शनानंतर आपण भारावून गेलो असून छत्रपती शिवाजी महाराजांवर आगामी चित्रपटात उसगांव येथील शिवसंस्कृती प्रतिष्ठानच्या ढोल ताशा पथकाला संधी देणार असल्याचे सांगितले. पथकातील कलाकारांची मेहनत, वादनातील अचुकपणा, प्रशिक्षक प्रद्युम्न च्यारी यांचे कौतूक करताना इतरांची नक्कल न करता स्वतंत्र्यरित्या आपली वेगळी चाल व बोल निर्मिल्याबद्दल अभिनंदन केले. चित्रीकरणासाठी फोनची वाट पाहण्याची गोड व आश्चर्याचा धक्का देणारी बातमी दिली.