वार्ताहर/ हलगा
बस्तवाड येथील छत्रपती शिवराय शिवसृष्टी युवक मंडळ व ग्रामस्थांच्यावतीने शिवजयंती मोठय़ा उत्साहात साजरी करण्यात आली. शनिवार सकाळपासूनच विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी 8 च्या दरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची विधिवत जलाभिषेक करून पूजा-अर्चा करण्यात आली. त्यानंतर विविध आध्यात्मिक व धार्मिक कार्यक्रम झाले. या कार्यक्रमात गावातील महिलांनी व शिवभक्तांनी मोठय़ा संख्येने भाग घेतला. रविवार दि. 20 रोजी सायंकाळी 6 नंतर शिवप्रेमी व ग्रामस्थांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
हलगा येथे शिवजयंती उत्साहात
हलगा येथे महाराष्ट्र एकीकरण समिती व शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्यावतीने युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती शिवाजी चौक, मरगाई गल्ली येथील शिवमूर्ती आवारात उत्साहात साजरी करण्यात आली. सागर बिळगोजी यांच्या हस्ते शिवमूर्तीला जलाभिषेक घालून पूजन करण्यात आले. यावेळी प्रेरणामंत्र म्हणण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय, भारत माता की जय, जय भवानी जय शिवाजी आदी घोषणा यावेळी देण्यात आल्या. यावेळी शिवभक्त मोठय़ा संख्येने उपस्थित होते.









