महान चित्रकार जी. कांबळे यांच्या छत्रपती शिवरायांवरील जगप्रसिद्ध चित्राच्या प्रतिकृतीची निर्मिती कोल्हापुरी युवकांचा कलाविष्कार हर्षल सुर्वे यांच्या व्यक्तिमत्व खुबीने वापर
संजीव खाडे / कोल्हापूर
युगपुरूष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या व्यक्तीमत्वासह त्यांच्या जीवनातील अदभूत प्रसंगावरील हजारो चित्रे, छायाचित्रे आणि शब्दरूपातील पुस्तके, ग्रंथ प्रसिद्ध आहेत. शिवरायांवरील चित्रपट, गाणी आणि पोवाडे देखील तितकेच प्रसिद्ध आहेत. चित्र, शब्द, ध्वनीरूपातून प्रकटणारे शिवप्रभू शिवभक्तांमध्ये ऊर्जा निर्माण केल्याशिवाय राहत नाहीत. शिवाजी या तीन अक्षरातील शक्ती, ताकद आजही साडेतीनशे चारशे वर्षांनंतरही कायम आहे. त्यातून मिळालेल्या ऊर्जेतून चित्रकार विपुल हाळदणकर आणि छायाचित्रकार हर्षद पाटील या कोल्हापूरच्या दोन युवाकलाकारांनी कलायोगी जी. कांबळे यांच्या पुंचल्यातून आकारास आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जगप्रसिद्ध चित्राची प्रतिकृती साकारली आहे. शिवराज्याभिषेक सोहळय़ाच्या निमित्ताने कलायोगींच्या चित्राचा रिमेक प्रसिद्ध केला आहे.
शिवरायांवरील ऐतिहासिक चित्रपट चित्रतपस्वी शिवभक्त भालजी पेंढारकर यांनी निर्माण केले. कलायोगी जी. कांबळे आणि जे. बी. सुतार यांची शिवाजी महाराजावरील चित्रे प्रसिद्ध आहेत. यामध्ये कलायोगी जी. कांबळे यांनी आपल्या जादूई कुंचल्यातून साकारलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्र आज केवळ शिवभक्तांच्या घराघरात नाही तर मनामनात आहे. या चित्राला महाराष्ट्र सरकारने राज्यमान्यताही दिली आहे. या चित्रातून आणि कलायोगींच्या कलेतून पेरणा घेत विपुल हाळदणकर आणि हर्षद पाटील यांनी शिवरायांचे चित्र साकारले आहे. त्यासाठी मॉडेल म्हणून त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणारे शिवभक्त अभिनेते आणि युवा सेनेचे राज्यस्तरावरील पदाधिकारी हर्षल सुर्वे यांच्या व्यक्तीमत्वाचा वापर केला.
चित्र निर्मितीची कथा विपुल हाळदणकर यांनी सांगितली. ते म्हणाले, लॉकडाऊनच्या काळात खरंतर कलाकारांना आणखीन वेळ मिळाला तो म्हणजे , सध्य परिस्थितीवर व्यक्त होण्याचा!. त्यातून आम्ही निरनिराळ्या जुन्या कल्पनांना व जुन्या चित्रांना नवीन पद्धतीने लोकांसमोर आणण्यासाठी प्रयत्नशील झालो! कामाला सुरुवात केली! अंबाबाई, पार्वती अशा काही कलाकृती साकारल्या. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांवरील चित्र साकारण्याचा मोह आवरला नाही. विचार करत असताना माझ्या समोर मॉडेल म्हणून हर्षल सुर्वे आले. सहकाऱयांशी चर्चा करून मी हर्षल सरांना कॉल केला! आणि सर्व माहिती दिली. क्षणाचाही विलंब न करता त्यांनी लगेच कामाला होकार दिला! आणि आमची तयारी सुरू झाली. कलायोगी जी. कांबळे यांच्या अप्रतिम चित्राची प्रतिकृती आपण करावी हा विचार पक्का झाला. कपडे अर्थात पोषाख, तलवार व इतर शस्त्रs, मेकअप, आणि प्रकाश योजना, वातावरण निर्मिती करत चित्ररूपी कलाकृती पूर्ण होत गेली. प्रारंभी सर्व साहित्याची जुळवाजुळव केली. मग हर्षल सरांनी पोषाख परिधान केला. सुभद्रा गोपाळकर यांनी रंगभूषा अर्थात मेकअप केला. छायाचित्रकार हर्षद पाटील यांनी विविध अँगलमधून फोटो (छायाचित्रे) घेतले. शेकडो फोटोतून एका फोटो निवडला. त्यावरून आयपॅडवर ऍटोडेस्क स्केचबुक ऍप्लिकेशनच्या माध्यमातून प्रथम संगणकावरील चित्र साकारले. याला मिक्स मेडियम डिजीटल वर्क म्हणतात. पुढे हेच चित्र कॅनव्हॉसवर रंग, ब्रशच्या माध्यमातून काढणार असल्याचे विपुल हाळदणकर यांनी सांगितले.
भारतीय पुरातन चित्रे जतन करण्याचा प्रयत्न
विपुल हाळदणकरने चित्रकलेचे शिक्षण कलानिकेतनमध्ये, भारतीय शिल्पकलेचे शिक्षण बंगळूरमध्ये घेतले आहे. तो मातीकामही करतो. भारतीय पुरातन चित्रे जतन करण्याचे काम, वारसा जपण्याचे काम प्रतिकृतीच्या माध्यमातून काढण्याचा त्याचा प्रयत्न आहे. पूर्वीच्या चित्रांचे रेझ्युलेशन कमी असते. गुगल सर्च इंजिनवर ही चित्र मोठय़ा आकारात मिळत नाहीत. आता प्रतिकृतीमुळे अशी चित्रे मोठय़ा, भव्य आकारात साकारणे, प्रसिद्ध करणे कॉम्पुटरमुळे शक्य होणार आहे, असे विपुल हाळदणकरने सांगितले.
शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून ही कलाकृती प्रदर्शित करताना मनस्वी आनंद आहे. कलायोगी जी. कांबळे आणि त्यांच्या कलाकृतीचा मान ठेवून ही प्रतिकृती साकारली आहे. भविष्यात कोल्हापूरची कला आणि कलाकारांच्या अस्सल कामाला पुढे आणण्याचा प्रयत्न करणार आहे.
-विपुल हळदणकर, युवा चित्रकार