गटारीवरील उघडय़ा लोखंडी सळय़ा नागरिकांना बनल्या धोकादायक : स्मार्ट सिटी कंपनीच्या अधिकाऱयांचे दुर्लक्ष

प्रतिनिधी /बेळगाव
स्मार्ट सिटी योजनेमध्ये शहराची निवड झाल्यानंतर ड्रीम प्रोजेक्ट म्हणून प्रायोगिक तत्त्वावर शिवबसवनगर येथील केपीटीसीएल रस्त्याचा विकास करण्यात आला आहे. तसेच परिसरातील अन्य रस्त्याचा विकास करण्यात येत आहे. पण काही कामे अर्धवट असल्याने वाहनधारकांना धोका निर्माण झाला आहे. तसेच गटारीवरील उघडय़ा लोखंडी सळय़ा नागरिकांना धोकादायक बनल्या आहेत.
स्मार्ट सिटी योजनेच्या पहिल्या 20 शहरांच्या यादीत बेळगाव शहराची निवड झाली. त्यानंतर स्मार्ट रस्ते करण्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर दोन रस्त्यांची निवड करण्यात आली. शिवबसवनगर येथील केपीटीसीएल रोड व मंडोळी रोडचा समावेश करण्यात आला आहे. दोन्ही रस्त्यांच्या विकासासाठी 25 कोटीच्या निधीची तरतूद करण्यात आली. यापैकी मंडोळी रोडच्या विकासाचे काम अद्यापही सुरू आहे. तर केपीटीसीएल रोडचे काम अडीच वर्षांच्या कालावधीनंतर पूर्ण करून रस्ता खुला करण्यात आला. या ठिकाणी जलवाहिन्या, विद्युत वाहिन्या, मोबाईल केबल, डेनेज वाहिन्या आदी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच प्रत्येकासाठी डक्ट निर्माण करण्यात आले आहे. रस्त्याचा विकास करण्यासाठी बराच कालावधी लागला. येथील विद्युत वाहिन्या व जलवाहिन्यांच्या जाळय़ामुळे रस्त्याचे काम पूर्ण होण्यास विलंब लागला. तसेच एस. जी. बाळेकुंद्री महाविद्यालयासमोरील रस्त्याचे काम स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत करण्यात येत आहे. पण सदर काम अर्धवट असून काही ठिकाणी गटारीवर लोखंडी सळय़ा उघडय़ा असल्याने नागरिकांना धोका निर्माण झाला आहे.
वाहनधारकांना चरीचा धोका
तसेच काही ठिकाणी चरी खोदून ठेवण्यात आल्या असून काम रखडले आहे. सदर ठिकाणी काही जलवाहिन्या असून रस्त्याच्या कडेला असलेल्या चरीचा धोका वाहनधारकांना निर्माण झाला आहे. त्यामुळे सदर रस्त्याचे काम कधी पूर्ण होणार, असा मुद्दा उपस्थित करण्यात येत आहे. याकडे स्मार्ट सिटी कंपनीच्या अधिकाऱयांचे दुर्लक्ष झाले आहे. स्मार्ट सिटीच्या कामाबद्दल सखेद आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.









