प्रतिनिधी/ गोडोली
शिवथर (ता. सातारा) हद्दीतील इंगवले वस्तीजवळ आयशर टेम्पो आणि दुचाकी यांची समोरासमोर धडक होऊन दुचाकीवरील दोन युवक जागीच ठार झाल्याची दुर्देवी घटना सायंकाळी 6.30 च्या सुमारास घडली. दरम्यान, या दुचाकीवरुन तिघेजण प्रवास करत होते. त्यातील एक जखमी युवकास पोलिसांनी उपचारासाठी सातारा जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. ठार झालेल्या युवकांपैकी एकजण मालगाव व एकजण साताऱयातील आहे.
सातारा ते आदर्की फाटा या रस्त्याचे काम पूर्ण झाल्यापासून वाहनांचा वेग वाढला असून सातत्याने अपघातांची मालिका सुरू झाली आहे. या राजमार्गावर कोणत्याही गावाजवळ गतीरोधक नसल्याने मोठय़ा प्रमाणावर अपघात होत असल्याचे समोर आले आहे.
या अपघाताची अधिक माहिती अशी, रविवार दि. 25 एप्रिल रोजी सायंकाळी 6.30 च्या सुमारास सातारा तालुक्यातील शिवथर हद्दीतील इंगवले वस्तीजवळ रस्त्यावरुन आयशर टेम्पो (एम. एच. 09 एफ. एल. 1512) हा सातारवरुन फलटणला जात होता. याच दरम्यान फलटण बाजूकडून समोरुन येणाऱया दुचाकी हिरो होंडा (एम. एच. 11 सी. डी. 7855) यांची समोरासमोर धडक झाली.
ही धडक एवढी भीषण होती की या अपघातात विशाल वाल्मीक कुंभार (वय 32, रा. मालगाव, सातारा) आणि शंकर क्षीरसागर (रा. रविवार पेठ, सातारा) हे दोन्ही युवक जागीच ठार झाले. तर याच दुचाकी गाडीवरील तिसरा युवक जीवन पवार (रविवार पेठ, सातारा) जखमी झाला असून त्याला उपचारासाठी सातारा जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अपघाताची माहिती मिळताच सातारा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करुन अपघातग्रस्त वाहने रस्त्यातून बाजुला केली. तसेच जखमीला तातडीने उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवले. दरम्यान, या अपघातप्रकरणी पोलिसांनी आयशर टेम्पो चालकावर गुन्हा दाखल केला असून त्याचे नाव समजू शकले नाही. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.
गाव तिथे गतीरोधक हवा
सातारा ते वाठार स्टेशनपर्यंत हा राजमार्ग रस्ता सध्या स्टार रोड झाला असून वाहनांचा वेग वाढला आहे. रस्ता लगतच्या गावाजवळ आल्यानंतर ही वाहनांचा वेग कमी होत नाही. सुसाट वेगाने येणाऱया, जाणाऱया वाहनांचे सातत्याने अपघात होतात. यामुळे प्रत्येक गावाच्या हद्दीत गतीरोधक आवश्यक आहेत. बांधकाम विभागाने याबाबत तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी वडूथ (ता. सातारा) येथील सामाजिक कार्यकर्ते हरिदास साबळे यांनी केलीय.









