‘जय भवानी जय शिवाजी’ घोषणा : शिवचरित्रातील प्रसंगाचे आकर्षक देखावे, भगवे ध्वज,ढोल-ताशांचा गजर
प्रतिनिधी/ बेळगाव
शहराचा सांस्कृतिक वारसा जपणाऱ्या व मनामनात शिवतेजाचे स्फुल्लिंग चेतविणाऱ्या शिवजयंती चित्ररथ मिरवणुकीने अवघे शहर शिवमय होऊन गेले. तसेच ‘जय भवानी जय शिवाजी’ या घोषणांनी दणाणून गेले. या शिवतेजाचे सळसळते चैतन्य पाहण्यासाठी आलेल्या शिवप्रेमींच्या गर्दीने शहरातील रस्ते फुलून गेले. सायंकाळी 6 वाजता सुरू झालेली मिरवणूक पहाटेपर्यंत सुरू राहिली. तरी शिवप्रेमींचा उत्साह कायम होता, हे विशेष!
बेळगावात होणाऱ्या ऐतिहासिक शिवजयंतीला शिवभक्तांनी भरभरुन प्रतिसाद दिला. शिवचरित्रातील प्रसंगाचे देखावे, भगवे ध्वज,ढोल-ताशांचा गजर, शिवकालीन पोवाडे, पारंपरिक वेशातील कलाकार आणि शिवमय संचारलेले वातावरण असे चित्र शनिवारी झालेल्या शिवजयंती चित्ररथ मिरवणुकीत दिसून आले. रविवारी पहाटेपर्यंत शिवभक्तांचा सळसळता उत्साह आणि जल्लोष या मिरवणुकीतून दिसून आला.

बेळगावमध्ये अक्षयतृतिया दिवशी पारंपरिक पद्धतीने शिवजयंती साजरी केली जाते. शिवजयंतीच्या तिसऱ्या दिवशी शहरातून भव्य चित्ररथ मिरवणूक निघते. परंतु या वर्षी कर्नाटक विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता असल्यामुळे ही मिरवणूक होऊ शकली नाही. प्रशासनाने केलेल्या विनंतीनुसार शिवजयंती उत्सव महामंडळाने शनिवार दि. 27 मे रोजी चिरत्रथ मिरवणूक काढण्याचे निश्चित केले. त्यानुसार शनिवारी बेळगावमध्ये भव्य, दिव्य अशी शिवजयंती मिरवणूक काढण्यात आली.
शनिवारी दुपारी 1 वाजल्यापासून मारुती गल्ली येथे चित्ररथ मिरवणुकीतील वाहने आणून लावण्यात आली. सायंकाळी 6 वाजता पालखी मिरवणुकीने चित्ररथ मिरवणुकींची सुरूवात झाली. सर्व शिवभक्तांना देखावा पाहता यावा यासाठी 6.30 वाजल्यापासूनच देखाव्यांचे सादरीकरण करण्यात आले. बेळगावसह खानापूर, चंदगड व आसपासच्या खेड्यातील हजारो शिवभक्त चित्ररथ मिरवणूक पाहण्यासाठी शहरात दाखल झाले होते. यामुळे शहराच्या मध्यवर्ती भागाबाहेर पोलिसांनी वाहतूक अडविली होती. त्यामुळे यंदेखूट, उभामारुती, कोनवाळ गल्ली या परिसरात वाहने लावण्यात आली होती.
मिरवणुकीला सुरूवात जरी झाली असली तरी गती मात्र अत्यंत संथ होती. त्यामुळे गणपत गल्लीतून येणारे चित्ररथ देखावे मारुती गल्लीच्या पुढे सरकू शकले नाही. झालेली गर्दी आणि मिरवणुकीला होत असलेला उशीर यामुळे काही चित्ररथ देखावे रात्री 12 वाजेपर्यंत मारुती गल्लीतच होते. यामुळे मंडळाच्या पदाधिकाऱ्यांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत होती. मिरवणुकीमध्ये कोठेही विस्कळीतपणे येवू नये यासाठी पोलिसांचेही प्रयत्न सुरू होते.
रात्री उशीरापर्यंत मिरवणूक सुरू असल्याने लहान दुकानांनी मिरवणूक मार्ग फुलला होता. मारुती गल्ली, गणपत गल्ली, किर्लोस्कर रोड, समादेवी गल्ली, धर्मवीर संभाजी चौक या परिसरात वडापाव, भजी, चहा, आयस्क्रीम, स्वीटकॉन यासह इतर चटपटीत पदार्थ विक्री करणारे स्टॉल ठिकठिकाणी दिसून आले. उन्हाळ्याचा काळ असल्यामुळे पाण्याच्या बॉटल विक्री करणारे स्टॉलही उभे करण्यात आले होते. काही नागरिकांनी स्वत:हून मोफत अल्पोपहारचे वितरण केले.

मर्दानी खेळांनी आणली रंगत
शिवजयंती चित्ररथ मिरवणुकीत शिवकालीन युध्दकला व मर्दानी खेळांचे सादरीकरण केले जाते. यावर्षीही दानपट्टा, तलवारबाजी, करेला, लाठीकाठी, लेझीम या सारख्या कला सादर करण्यात आल्या. महाराष्ट्रातील काही मंडळांनी अप्रतिम अशी लेझीम सादर केली.
प्रतापगडच्या रणसंग्रामाने वाढविली शोभा
चव्हाट गल्ली येथील शिवजयंती मंडळाने प्रतापगडचा रणसंग्राम हा अप्रतिम असा देखावा सादर केला. अफजलखानाने छत्रपती शिवाजी महाराज यांना पकडण्यासाठी प्रतापगडवर चाल केली. परंतु छ. शिवाजी महाराज यांनी अफजलखानाचा वध केला. हा देखावा चव्हाट गल्लीतील मंडळाने सुरेखपध्दतीने सादर करुन शिवभक्तांची मने जिंकली.
साप्ताहिक सुट्टीमुळे तुफान गर्दी
यावर्षी शिवजयंती चित्ररथ मिरवणूक शनिवारी काढण्यात आली. चौथा शनिवार असल्यामुळे सर्वच सरकारी कार्यालयांना सुट्टी होती. त्यामुळे रात्री 9 नंतर चित्ररथ मिरवणूक पाहण्यासाठी गर्दी वाढत गेली. रविवारी साप्ताहिक सुट्टी असल्यामुळे चित्ररथ मिरवणूक पाहण्यासाठी नोकरदारांची संख्या अधिक होती. दुसऱ्या दिवशी रविवार असल्यामुळे रात्री उशीरापर्यंत चित्ररथ पाहण्यासाठी नागरिकांची तुफान गर्दी दिसून आली. आपल्या कुटुंबासमवेत शिवचरित्रातील देखावे पाहण्यासाठी मिरवणूक मार्गावर गर्दीने रस्ते फुलले होते.

गॅलरी उभारल्याने शिवभक्तांची सोय
धर्मवीर संभाजी चौक येथे शिवभक्तांच्या सोयीसाठी दरवर्षी गॅलरी उभारली होती. मागील वर्षी महानगरपालिकेने गॅलरी न उभारल्याने शिवभक्तांना धर्मवीर संभाजी चौकात उभे राहून मिरवणूक पहावी लागली होती. यामुळे गर्दीतही वाढ झाली. यावर्षी मात्र शनिवारी दुपारनंतर महापालिकेने गॅलरी उभारली. यामुळे शिवभक्तांना चित्ररथ मिरवणूक पाहणे सोयीचे ठरले. गॅलरीमुळे रस्त्यावर होणारी गर्दी कमी होण्यास मदत झाली.
भांदुर गल्ली मंडळाचा स्तुत्य उपक्रम
डी.जे.ला फाटा देत काही मंडळांनी यावर्षी नवनवीन उपक्रम राबविले. भांदुर गल्ली येथील स्वराज्य मित्र मंडळाने इस्कॉनच्या भजनाद्वारे मिरवणुकीत वेगळीच रंगत आणली. ‘हरी बोल’ या नाम घोषामध्ये टाळ व मृदंग यांच्या तालावर हरे कृष्णाच्या गजरात नृत्य करण्यात आले. हे पाहण्यासाठी शिवभक्तांची मोठी गर्दी झाली होती. यावर्षी बऱ्याच मंडळांनी असे विविध प्रयोग करत शिवजयंतीची पारंपरिकता जपण्याचा प्रयत्न केला.

गजर ढोल-ताशांचा
बेळगावमध्ये होणाऱ्या चित्ररथ मिरवणुकीला ऐतिहासिक महत्त्व आहे. आजही येथे पारंपरिक पध्दतीने शिवजयंती चित्ररथ मिरवणूक काढली जाते. यावर्षीच्या मिरवणुकीचे मुख्य आकर्षण ठरले ते ढोल-ताशा आणि ध्वजपथक. बेळगावमधील एकाहून एक सरस ढोल-ताशा व ध्वजपथकांनी पारंपरिक वाद्यांचा गरज केला. प्रारंभी मोरया ढोल-ताशा पथकाने सायंकाळी 6.30 पासून वादनाला सुरूवात केली. नरवीर प्रतिष्ठानच्या नरवीर ढोल-ताशा व रणरागिणी ध्वजपथकाने मिरवणुकीमध्ये रंगत आणली. 100 हून अधिक युवतींनी ढोल-ताशांच्या आवाजावर ठेका धरला. याचबरोबर धाडस व वज्रनाथ या ढोल पथकांनीही ढोल-ताशांचा गरज केला.
लोकप्रतिनिधींना विचारला जाब
डी.जे.वर निर्बंध घालण्यात आल्याने मिरवणुकीच्या सुरूवातीपासूनच पोलीस प्रशासनाने कडक कारवाई सुरू केली. प्रारंभी काही चित्ररथांवर मोठे डी.जे. लावण्यात आले होते. पोलिसांनी या डी.जे.वर आक्षेप घेत एक बेस एक टॉप असेल तरच परवानगी दिली. यामुळे काही कार्यकर्ते संतप्त झाले. एरवी मोठमोठे डी. जे. लावून मिरवणूक काढणारे लोकप्रतिनिधी मूग गिळून गप्प असल्याने कार्यकर्त्यांनी त्यांना धारेवर धरले. यामुळे लोकप्रतिनिधींनी तेथून काढता पाय घेतला.

माळी गल्लीने जपली पारंपरिकता
चित्ररथ मिरवणुकीची पारंपरिकता जपत माळी गल्ली येथील छत्रपती शिवाजी युवक मंडळ यावर्षी अनोख्या पध्दतीने सहभागी झाले होते. बैलगाडीवर छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती बसवून समोर घोडे अशा पारंपरिक वातावरणात चित्ररथ मिरवणुकीत कार्यकर्ते सहभागी झाले होते. डी.जे.ला फाटा देत या मंडळाने एक वेगळा उपक्रम राबवत शिवभक्तांचे लक्ष वेधून घेतले. त्यामुळे बैलगाडी व घोड्यांसमवेत फोटो काढण्याचा मोह शिवभक्तांना आवरला नाही.
भाषा टिकली तरच धर्म टिकेल
बेळगावमध्ये मराठी भाषिकांची संख्या सर्वाधिक असली तरी येथे मराठी भाषिकांवरच अन्याय केला जातो. या अन्यायाला वाचा फोडून छत्रपती शिवाजी महाराज यांनी मराठी भाषेसाठी केलेले कार्य बापट गल्ली येथील कालिका देवी युवक मंडळाने आपल्या देखाव्यातून दाखवून दिले. भाषा टिकली तर धर्म टिकेल आणि धर्म टिकला तरच राष्ट्र टिकेल या विषयावर आधारीत त्यांनी उत्तम असा देखावा सादर केला. मराठी भाषिकांनीही या चित्ररथाला भरभरुन प्रतिसाद दिला.
सायंकाळी 6.30 पासूनच देखाव्यांना सुरूवात
मागील वर्षी चित्ररथ मिरवणुकीला विलंब झाल्यामुळे सजीव देखावे सादर करण्यास वेळ मिळाला नव्हता. यावर्षी मात्र मंडळांनी सायंकाळी 6.30 पासूनच देखाव्याच्या सादरीकरणाला सुरूवात केली. छत्रपती शिवाजी रोड येथील सह्याद्रीपुत्र युवक मंडळ येथील मंडळाने पहिला देखावा सादर केला. पावनखिंड येथील जाज्वल्य इतिहास कलाकारांनी हुबेहुब सादर करत शिवभक्तांमध्ये नवचैतन्य पसरविले. समर्थनगर येथील एकदंत युवक मंडळानेही पावनखिंडचा अप्रतिम असा इतिहास सादर केला.
ढोल ताशांचा गजर, पारंपरिक वेशात दाखल झालेले शिवप्रेमी नागरिक, शिवकालीन प्रसंगांवर आधारित उद्भोदक चित्ररथ आणि त्यावरील प्रेरणादायी जीवंत सादरीकरण अशा वातावरणात बेळगावच्या ऐतिहासिक आणि पारंपरिक शिवजयंती उत्सव सोहळ्यातील प्रमुख आकर्षण ठरणाऱ्या चित्ररथ मिरवणुकीची सायंकाळी 6.30 वाजता सुऊवात झाली. ही मिरवणूक यंदाही वैशिष्ट्यापूर्ण चित्ररथांमुळे लक्षणीय ठरली. शिवरायांच्या जीवनचरित्रावर आधारीत एकापेक्षा एक देखाव्यांनी मिरवणुकीची शोभा वाढविली होती. पारंपरिक प्रसंगांना आधुनिक घडामोडींची झालर देत शिवजयंती मंडळांनी देखाव्यांमध्ये रंग भरल्याने मिरवणूक पाहण्यास आलेल्या शिवप्रेमींचे स्फुरण आणखीनच वाढत होते. बेळगावच्या रस्त्यांवर अवघी शिवसृष्टीच अवतरल्याचा भास निर्माण होत होता.
देखाव्यांनी वाढविली मिरवणुकीची शोभा
पारंपरिक देखाव्यांचे उत्तम सादरीकरण चित्ररथ मिरवणुकीची शोभा वाढवून गेले. जास्तीत जास्त मंडळांनी देखाव्यांवर भर दिला होता. शिवरायांच्या हिंदवी स्वराज्य स्थापन्याच्या कार्यातील महत्त्वाचे प्रसंग देखाव्याद्वारे मांडण्याची पद्धत बेळगावकर अनेक वर्षें जपत आले आहेत. यामुळेच बेळगावच्या शिवजयंती उत्सवाला आणि विशेषत: चित्ररथ मिरवणुकीला आगळे स्वऊप प्राप्त झाले आहे. यंदाही याचेच चित्रण पहावयास मिळाले आणि याचा आनंद नागरिकांनी मनसोक्त घेतल्याचे दिसून आले.
मिरवणूक पाहण्यासाठी बेळगाव शहर परिसर, उपनगरी भाग तसेच बाहेर गावचे शिवप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने दाखल झाले होते. विशेषत: नरगुंदकर भावे चौकापासून कॉलेज रोडपर्यंतच्या मिरवणुकीच्या मार्गावर शिवप्रेमींची प्रचंड गर्दी झाली होती. माऊती गल्ली, हुतात्मा चौक, रामदेव गल्ली, समादेवी गल्ली आणि कॉलेज रोड परिसरात मोठी गर्दी होती. यामध्ये तरुणाईची संख्या अधिक होती. अबालवृध्दांनीही कॉलेजरोड येथील दुभाजक तसेच गॅलरी येथे बसून मिरवणुकीचा आनंद लुटला. जय भवानी, जय शिवाजीच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता.
क्षणचित्रे
►मिरवणुकीत मराठमोळे वातावरण
►डी.जे.ला मोठ्या प्रमाणात फाटा
►झांजपथक आणि लाठीमेळ्यावर भर
► महिलांचा लक्षणीय सहभाग
► रात्री 10 नंतर गर्दीत वाढ
►युवावर्गाने शिस्तबद्धरित्या पार पाडली मिरवणूक
►स्वखर्चाने मेकअप कऊन जीवंत देखावे सादर
►प्रेक्षागृहामुळे मिरवणूक पाहणे झाले सोयीचे
►लहान व्यापाऱ्यांनी फुलले रस्ते









