जिल्हा प्रशासनातर्फे शिवजयंती साजरी

बेळगाव : जिल्हा प्रशासन, कन्नड आणि सांस्कृतिक विभाग यांच्यावतीने शिवजयंती निमित्त शिवाजी उद्यान येथील छत्रपती शिवरायांच्या मूर्तीची पूजा करण्यात आली. यावेळी आमदार अनिल बेनके, जिल्हा पंचायत अध्यक्षा आशा ऐहोळे, पालिका आयुक्त जगदीश के. एच. व मान्यवर उपस्थित होते. आमदारांच्या हस्ते छत्रपती शिवरायांच्या मूर्तीला पुष्पहार घालून पूजन करण्यात आले. यावेळी कन्नड व सांस्कृतिक खात्याच्या उपसंचालिका विद्यावती बजंत्री उपस्थित होत्या.
शिवछत्रपती सेवा संघातर्फे शिवजयंती साजरी

बेळगाव : येथील शिव छत्रपती संघ बेळगावच्यावतीने शुक्रवारी सकाळी शहापूर येथील शिवाजी उद्यानात छत्रपती शिवाजी महाराजांची 391 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. प्रारंभी प्रेरणामंत्र म्हणण्यात आला. राजू शेट्टी यांच्या हस्ते दुग्धाभिषेक करण्यात आला. साईराज शेट्टी यांच्या हस्ते महाराजांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले.
यावेळी राजू शेट्टी म्हणाले, 19 फेबुवारी 1630 रोजी किल्ले शिवनेरीवर जिजाऊ मातेच्या पोटी शिवरायांचा जन्म झाला. या गडावरील शिवाई देवीवरून जिजाऊंनी आपल्या मुलाचे नाव शिवाजी असे ठेवले, असे सांगितले. यावेळी विनायक शेट्टी, राणी शेट्टी, गौरी चौगुले, बाळकृष्ण घाटकर, रोहित फडतरे, स्वयंम फडतरे, जोतिबा श्रीनाथ पवार, लक्ष्मी चौगुले, उमा घाटकर आदी शिवभक्त उपस्थित होते.
शिवमहोत्सवातून शिवशाहीचा गजर भाऊराव काकतकर महाविद्यालयात साजरी झाली शिवजयंती

बेळगाव : छत्रपती शिवाजी महाराज म्हटले की अंगात एक स्फुरण चढते, एक जोश निर्माण होतो. असाच काहीसा जोश शुक्रवारी भाऊराव काकतकर महाविद्यालयात दिसून आला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या शिवमहोत्सवामध्ये एकापेक्षा एक सरस पोवाडे, लोकगीते, भाषण व वेशभूषा पहायला मिळाली. यामुळे संपूर्ण कॉलेजचा परिसर शिवमय झाला होता.
कॉलेजच्या पॉलिटीकल सायन्स विभागाच्यावतीने प्रतिवर्षाप्रमाणे यावषीही शिवमहोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी प्राचार्य डॉ. एस. एन. पाटील यांच्या हस्ते शिवमूर्तीचे पूजन करण्यात आले. संचालक विक्रम पाटील, डॉ. एम. एम. मोहिते, प्रा. अनिता पाटील, प्रा. भक्ती देसाई उपस्थित होत्या. यामध्ये 45 ते 50 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
लोकगीत गायन स्पर्धेत रिहान मुल्ला याने पोवाडा गायन करून प्रथम क्रमांक मिळविला. अनिकेत चलवेटकर याने वेषभूषा, पूजा रेमाण्णाचे हिने भाषण स्पर्धा तर श्रीनिधी अप्पुगोळ हिने लोकगीत स्पर्धेत क्रमांक पटकाविला. रेहान मुल्लाने सादर केलेला पोवाडा उपस्थितांच्या टाळय़ा मिळवून गेला.
व्हिडिओचा सर्वत्र धुमाकूळ

महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी आकर्षक असा भव्य शिवाजी महाराजांचा बॅनर लावला होता. त्याचे अनावरण विशेष पद्धतीने करण्यात आले. त्यामुळे शुक्रवारी दिवसभर हा व्हिडिओ धुमाकूळ घालत होता. अनेकांच्या व्हॉट्सऍप डीपीवर बी. के. महाविद्यालयाचा हा व्हिडिओ दिसून आला. शिवाजी महाराजांविषयीची महाविद्यालयीन तरुणांची यामधून आत्मियता दिसून आली.
घरोघरी साजरी झाली शिवजयंती
बेळगाव : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, रयतेचे राजे, कुशल प्रशासक, अफाट सामर्थ्यवान, उत्तुंग धाडस, शौर्य, पराक्रम, कीर्तीवंत, अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत, श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 351 व्या जयंतीनिमित्त घरोघरी शिवजयंती साजरी करण्यात आली.
शिवजयंतीनिमित्त येथील नार्वेकर गल्ली शहापूरमधील बालचमूंनी सकाळी शिवमूर्तीचे पूजन केले. यावेळी सांगवी, खटावकर, साची खटावकर, स्वयम्, नचिकेत, सक्षम नाईक यांसह अनेक बालचमू उपस्थित होते.
छ. शिवाजी महाराजांच्या आदर्शावर वाटचाल करा
बेळगाव : छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणत्याही जाती, धर्म, पंताला थारा दिला नाही. त्यांनी सर्वांना सोबत घेवून स्वराज्याची स्थापना केली. त्यामुळे ते केवळ एका जाती किंवा धर्माचे नसून ते समस्त हिंदुस्थानाचे आदर्शवत आहेत. त्यांचे कार्य कौतुकास्पद आहे. त्यांनी घालून दिलेल्या आदर्शावर वाटचाल केल्यास निश्चितच आपण यशस्वी होवू, असे प्रतिपादन शिवभक्त साईनाथ डवरी यांनी केले.
कडोली येथील चंद्रशेखर आझाद गल्ली येथे श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्यावतीने मोठय़ा भक्तीभावाने आणि आनंदात शिवजयंती साजरी करण्यात आली. यावेळी ते तरुणांना उद्देशून बोलताना सांगत होते. यावेळी कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळय़ाची विधीवत पूजा केली. जयंती निमित्त काही छोटेखानी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
सकाळपासूनच शिवजयंती उत्सव साजरा करण्यासाठी कार्यकर्त्यांची धावपळ सुरू होती. शिवजयंतीसाठी आर्षित असे डेकोरेशन करण्यात आले होते. फुलांच्या माळा व इतर सजावटीचे साहित्याने परिसर चैतन्यमय झाला होता. छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणांनी परिसर भगवेमय झाले होते. याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अनेकांनी माहिती जाणून घेतली.









