सावंतवाडी/ प्रतिनिधी-
शिवजयंतीचे औचित्य साधून स्वराज्य युवा मित्रमंडळ दांडेली, कोंडूरे तिठा, आरोस तसेच सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग, शाखा सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आरोस पंचक्रोशी विद्या विकास हायस्कूल आरोस, कोंडुरे तिठा येथे रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. शिवजयंती असल्याने चैतन्यमयी व उत्साहपूर्ण वातावरणात रक्तदात्यांनी, ग्रामस्थांनी व हितचिंतकांनी रक्तदान शिबिराला भरभरुन प्रतिसाद दिला.
निवृत्त पोलिस उपअधिक्षक तथा “सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान” चे सल्लागार दयानंद गवस यांच्या हस्ते शिवप्रतिमेला पुष्पहार घालून तसेच जि. प. सदस्य राजन मुळीक व पं. स. सदस्य संदीप नेमळेकर यांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलन करुन शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी “सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान” चे सावंतवाडी तालुका सचिव बाबली गवंडे यांनी संस्थेची ध्येयधोरणे व आत्तापर्यंतच्या प्रगतीचा आलेख याविषयी सविस्तर विवेचन करतानाच संस्थेच्या “रक्तदान, देहदान, अवयवदान, रुग्णमित्र आणि मित्रसंस्था” या पंचसूत्रीविषयी माहिती दिली.










