प्रतिनिधी / शिरोळ
अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान झालेल्या शिरोळ तालुक्यातील नागरिकांना अनुदानाचे वाटप केले जात आहे. पहिल्या टप्प्यात १० हजार १५७ पूरग्रस्त कुटुंबांना दहा हजार रुपयेप्रमाणे तर ८ हजार २२ कुटुंबांना पाच हजार रुपये प्रमाणे सानुग्रह अनुदान अशी कार्यवाही करण्यात आली आहे, अशी माहिती तहसीलदार डॉ. अपर्णा मोरे यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे दिली.
दहा हजार रुपये प्रमाणे १० कोटी १५ लाख ७० हजार रुपये सानुग्रह अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले आहे. तर पाच हजार रुपये प्रमाणे ४ कोटी १ लाख १० हजार रुपयाचे अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करण्याची कार्यवाही सुरु आहे. उर्वरीत ५ हजार रुपये प्रमाणे अनुदान प्राप्त झालनंतर लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहेत. शिवाय, मृत जनावरे, घर पडझड, गोठा पडझड, शेती नुकसान आदी नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. व्यावसायिक पंचनाम्याच्या याद्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार तपासणीचे काम सुरु आहे. घर पडझडीचे पंचनामे पूर्ण झाले असून शासनाकडून अनुदान प्राप्त होताच वाटप करण्यात येणार आहे.









