सात जणांना अटक, परस्परविरोधी फिर्याद दाखल
प्रतिनिधी/शिरोळ
शिरोळमध्ये किरकोळ कारणावरून दोन गटात जोरदार हाणामारी झाली. या हाणामारीत चार जण जखमी झाले असून त्यांना उपचाराकरता शतायु हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. ही घटना शनिवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास कववाड रोड वरील गोरख माने यांच्या वीटभट्टी जवळ घडली. याप्रकरणी दोन्ही गटातील सात जणांना अटक करण्यात आली आहे. आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता संकपाळ गटाकडील चौघांना एक दिवस तर माने गटातील आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, माजी सरपंच गजानन संकपाळ व माजी सरपंच गोरखनाथ माने यांच्या गटात किरकोळ कारणावरून वाद झाला होता. तो वाद समझोत्याने मिटवण्यासाठी गजानन संकपाळ गेल्या असता गोरख माने, अवधूत माने, मुकुंद माने, विनायक माने व अन्य लोकांनी लोखंडी सत्तुर वीट काठीने मारहाण केल्याची तक्रार रमेश संकपाळ यांनी दिली आहे. यामध्ये रमेश संकपाळ, पृथ्वीराज संकपाळ हे दोघे जखमी झाले. तर माने गटातील गोरखनाथ माने अवधूत माने, मुकुंद माने हे जखमी झाले.
तर गोरखनाथ माने यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की गजानन संकपाळ उदय संकपाळ पिंटू संकपाळ सागर संकपाळ राजू संकपाळ पृथ्वीराज संकपाळ व अन्य लोकांनी घराचे गेट उघडून विटा दगडाने लोखंडी गजाने मारहाण करून जातीवाचक शिवीगाळ केली असल्याची तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलिसांनी संकपाळ गटातील आठ जणांवर जातीवाचक शिवीगाळ मारहाण केल्याच्या गुन्हा दाखल केला आहे. तर माने गटातील चौघांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
अटक केलेल्या संशयितांना जयसिंगपूर येथील जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने संकपाळ गटाकडील चौघांना एक दिवस पोलीस कोठडी सु्नावली. तर माने गटातील आरोपींना जयसिंगपूर येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात हजर केले असता या तिघांना दोन दिवस पोलिस कोठडी सुनावली. या घटनेचा तपास जयसिंगपूर विभागाचे पोलीस उपाधिक्षक किशोर काळे फौजदार नवनाथ सुळ व पोलीस करीत आहेत.