प्रतिनिधी / शिरोळ
शिरोळ शहरातील माने गल्ली येथील चार संशयीत रुग्णांचे रक्त तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यापैकी दोघांना डेंग्यूची लागण झाली असल्याची माहिती जिल्हा हिवताप अधिकारी एम. जी. वड यांनी दिली. शहरातील ओंकार माने वय 19 व पंढरीनाथ माने वय 18 या दोघांना लागण झाली आहे. त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शहरात मोठ्या प्रमाणात सिमेंटच्या टाक्या असल्याने या टाक्यांमध्ये डासांच्या अळ्यांची उत्पत्ती होते. शहरातील घरोघरी जाऊन सर्वे सुरू केला असल्याचे सांगून एम. जी. वड म्हणाले की, नागरिकांनी घाबरून जाऊ नये. ताप, खोकला, अंगावर पुरळ येणे, डोळे लालसर होणे, डोकेदुखी, अशक्तपणा, भूक मंदावणे, पांढऱ्या पेशी कमी होणे ही डेंग्यूची लक्षणे असून अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले.
शिरोळ शहरातील साथीचा फैलाव रोखण्यासाठी व प्रतिबंध करण्यासाठी 14 पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. या पथकामार्फत घरोघरी जाऊन सर्वे करण्यात येत आहे. धूर फवारणी, अळीनाशक औषधाचा वापर करण्यात येणार असून नागरिकांनी एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा असे आवाहनही एम. जी. वड केले. शहरातील काही भागात डेंगूने थैमान मांडले आहे. तसेच घशाचा विकाराने नागरिक त्रस्त झाले आहेत नगरपालिकेचे नगराध्यक्ष अमरसिंह पाटील व त्यांच्या सर्व नगरसेवक आणि अधिकाऱ्यांनी जनजागृतीची मोहीम हाती घेतली आहे









