‘कोरोना लसीकरणासाठी नियोजनाचा अभाव असल्याचं स्पष्ट‘
पुलाची शिरोली/ वार्ताहर
प्रांताधिकारी विकास खरात यांच्याकडून शिरोली प्राथमिक आरोग्य केंद्रातील अधिकारी व कर्मचारी यांना कोविड लसीकरण कामावरून खडे बोल सुनावले.
शिरोली प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत सुमारे तीस हजार लोकांना कोविड लसीकरण करण्याचे नियोजन जिल्हा आरोग्य विभागाने केले आहे. पण या प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी, अंगणवाडी सेविका, आशा कर्मचारी , गावकामगार तलाठी ,ग्राम विकास अधिकारी व ग्रामपंचायत यांच्याकडून म्हणावे तितके प्रयत्न व नागरिकांच्यात जागृती झाली नसल्याचा आरोप खरात यांनी केला. प्रत्येक दिवसामध्ये सुमारे तेराशे लसीकरण करणे आवश्यक असताना फक्त ५१० इतक्या लोकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. हा आकडा अत्यंत कमी असून जे कर्मचारी कामात हलगर्जीपणा करीत आहेत. अशा लोकांना नोटीस बजावून त्यांना कामातून निलंबित करावे. अशा सुचना खरात यांनी गट विकास अधिकारी शबाना मोकाशी व तहसीलदार डॉ. प्रदीप उबाळे यांना दिल्या.
तसेच शिरोली, नागाव व टोप हि गावे कोरोनाच्या संसर्गात हॉटस्पॉट म्हणून ओळखले जातात. त्यामुळे या गावातील सरपंच ,गावकामगार तलाठी व ग्राम विकास अधिकारी यांनी लसीकरण मोहीम व्यापक प्रमाणात राबविण्यासाठी योग्य ती जबाबदारी पार पाडावी. असे खरात यांनी सांगितले. याप्रसंगी तहसीलदार डॉ. प्रदीप उबाळे, गटविकास अधिकारी श्रीमती शबाना मोकाशी, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुहास कोरे यांचेसह अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.