पुलाची शिरोली / वार्ताहर
पुलाची शिरोलीत आर्यन आत्महत्ये प्रकरणी काढण्यात आलेल्या मूक मोर्चास हिंसक वळण लागेल. काही तरुणांनी सिम्बॉलिक इंटरनॅशनल स्कूलवर दगडफेक करत शाळा प्रशासनाविरुद्ध आपला राग व्यक्त केला.
यामध्ये सुरक्षारक्षकाची केबिन, इमारतीत दुसऱ्या मजल्यावर असणाऱ्या क्लासरूम व प्रयोगशाळेच्या काचा फोडण्यात आल्या. शाळेमध्ये असणारे विद्यार्थी आणि शिक्षक यामुळे घाबरले. विशेष म्हणजे याच इमारतीत दहावीचे पेपर ही सुरू होते. सुदैवाने कोणत्याही विद्यार्थ्याला कसल्याही प्रकारची दुखापत झाली नाही. मोर्चाचे गांभीर्य ओळखून जिल्हा पोलिस प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेत मोठा बंदोबस्त तैनात केला होता.
पुलाची शिरोली येथील आर्यन हेरंभ बुडकर ( वय १५ ) या शाळकरी मुलाच्या आत्महत्येस कारणीभूत शिक्षण संस्था चालकांना तात्काळ अटक अन्यथा पुढचा मोर्चा पोलिस ठाण्यावर काढणार असल्याचा इशारा सरपंच शशिकांत खवरे, सामाजिक कार्यकर्ते गिरीश फोंडे यांनी दिला. शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर पाटील यांनी निवेदन स्विकारले. तसेच संबंधितांना तात्काळ अटक करत न्यायालयात हजर करणार असल्याचे सांगितले.
मोर्चासाठी सकाळी अकरा वाजता शिरोली ग्रामपंचायतीसमोर सिम्बाॅलिक स्कूलमध्ये शिक्षण घेत असणार्या विद्यार्थ्यांचे पालक व ग्रामस्थ जमले. यावेळी गिरीश फोंडे यांनी शांततेचे आवाहन करत मुक मोर्चा काढण्यात येणार असल्याचे सांगितले. तसेच निवेदनातील मजकूर वाचून दाखवला. त्यानंतर सरपंच शशिकांत खवरे यांनी मोर्चा संदर्भात काही सूचना दिल्या. त्यानंतर मोर्चास सुरवात झाली. आर्यनला न्याय द्या, सिम्बाॅलिक शाळा प्रशासनाचा जाहीर निषेध, अशा किती आर्यनचे बळी घेणार, सिम्बाॅलिक च्या पालकांनो सावध व्हा, आपला पाल्य योग्य हाती सोपवा, संस्था चालक गणपत पाटील व प्राचार्य गीता पाटील यांना अटक कधी होणार? अशा आशयाचे फलक हातात घेऊन हा मोर्चा गावातून शाळेसमोर आला. दहावीची परीक्षा सुरू असल्याने मोर्चाला शाळेच्या फाटकावर रोखले. तेथे निवेदन देऊन मोर्चाचा समारोप करण्यात आला. यावेळी शाळेच्या फाटकावर शाळा प्रशासनाच्या वतीने लावण्यात आलेला आर्यनच्या श्रध्दांजली चा फलक काढून घ्यावा. अशी मागणी मोर्चात सहभागी तरुणांनी केली. त्यानंतर हा फलक काढण्यात आला. तरीही मोर्चातून परत जात असताना काही तरुणांनी दगडफेक केली. त्यामुळे वातावरण गंभीर बनले.