मंगळवार सायंकाळपर्यंत 31 रूग्ण भर्ती
प्रतिनिधी / फोंडा
कोरोनाबाधित रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेता काराय शिरोडा येथील कोविड केअर सेंटर म्हणून आरोग्य खात्याने जाहीर केले आहे. त्यानंतर काल मंगळवारी राज्याचे मुख्य सचिव परीमल राय यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य खात्याचे टिमने सेंटरला भेट देऊन येथील परिस्थितीचा आढावा घेतला.
यावेळी आरोग्य खात्याच्या सचिव निला मोहनन, पोलिस उपसंचालक जसपाल सिंग, पोलिस अधिक्षक अरविंद गावस, आरोग्यधिकारी डॉ. विकास कुवेलकर, उपजिल्हाधिकारी केदार नाईक आदी उपस्थित होते. आरोग्य खात्याच्या टिमसह सदर सेंटरमध्ये कार्यरत असलेल्या डॉ. अक्षया पावस्कर यांच्यासमवेत चर्चा करण्यात आली. मांगोरहिल येथे कामाला जुंपलेल्या आरोग्य खात्याचे कर्मचाऱयांचा कोरोना अहवाल सकारात्मक येत असल्याने त्याना शिरोडा येथील कोविड केअर सेंटर येथे देखरेखेखाली ठेवण्यात आले आहे. तसेच त्याच्या संपर्कात आलेल्यांनाही येथे रवानगी करण्यात आली आहे. काल मंगळवार सायंकाळपर्यंत सुमारे 31 रूग्णांना भर्ती करण्यात आल्याची माहिती येथील डॉ. अक्षया पावस्कर यांनी दिली आहे. सदर इस्पितळात एकूण 60 रूग्णांना भर्ती करण्याची सोय उपलब्ध आहे.









