कोकरूड / वार्ताहर :
शिराळा तालुक्याच्या पश्चिम भागात मागील 24 तासात 574 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर वारणा काठावर महापूर पहावयास मिळत आहे. अनेक गावांचा संपर्क तुटला असून कोकरूड व शेडगेवाडी पूल पाण्याखाली गेल्याने 150 राज्य महामार्ग बंद झाला आहे.
तालुक्याच्या पश्चिम भागात पावसाने थैमान घातले असून वीज गर्जनेत ढगफुटी होत आहे. वारणा काठावर महापुराचे परिस्थिती निर्माण झाली आहे. तर आज दुपारी कधीच न बुडालेला कोकरूड पूल पाण्याखाली जाऊन गावास पुराच्या पाण्याचा वेढा बसला आहे. त्यामुळे राज्य मार्ग 150 वरील वाहतूक बंद झाली आहे. भागातील आरळा- शित्तुर पूल, चरण- सोंडोली पूल, कोकरुड- रेठरे पूल, बिळाशी- भेडसगाव पूल व खुजगाव ते शेडगेवाडी पूल, शेडगेवाडी ते हत्तेगाव पूल, येळापुर ते आटूगडेवाडी पूल, येळापुर ते समतानगर पूल पाण्याखाली गेल्याने वाहतूक ठप्प झाली आहे.
मागील 24 तासात 574 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. वारणेला आलेल्या महापुरामुळे सर्व परिसर जलमय झाला आहे तर नदी काठावरील सर्व पिके व शिवारातील शेड पाण्याखाली गेली आहेत. मोहरे, नाठवडे, कोकरूड गावास पुराच्या पाण्याचा वेढा बसला असून बिळाशी ते कोकरूड मुख्य रस्त्यावर पुराचे पाणी आल्याने वाहतूक बंद झाली आहे. शेडगेवाडी येथील राज्य मार्गावरील पूल पाण्याखाली जाऊन येथील काही व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले आहे.








