गोवा वेल्हा पोलिसांकडून तपास जारी, मुख्यमंत्र्यांकडून सखोल चौकशीचा आदेश
प्रतिनिधी/ पणजी
येथून जवळच असलेल्या शिरदोन समुद्रकिनारी दीड महिन्याच्या अर्भकाचा छिन्नविछिन्न स्वरुपातील मृतदेह सापडल्यामुळे या भागात खळबळ माजली असून या प्रकरणाने पोलिसांची झोपच उडाली आहे. याबाबतची माहिती गुरुवारी सायंकाळी उशिरा उघडकीस आल्यामुळे एकच खळबळ उडालेली असून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या प्रकरणाच्या चौकशीचा आदेश दिलेला आहे.
शिरदोन समुद्रकिनाऱयावर सापडलेल्या मृतदेहाचे तुकडे करण्यात आले आहेत. धडापासून मस्तक वेगळे केलेले होते. हात व पाय देखील विखरुन पडले होते. हे दृश्य पाहताना सर्वसामान्यांच्या अंगावर काटाच उभा राहील एवढी भयानक अवस्था होती. या संदर्भातील माहिती कोणीतरी गोवा वेल्हा पोलीस स्थानकावर दिली. त्यानंतर पोलिसांनी चौकशीस प्रारंभ केला मात्र त्यांच्या हाती काहीही लागले नाही.
मुख्यमंत्र्यांनी दिला चौकशीचा आदेश
या प्रकरणी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याकडे सचित्र माहिती पोहोचता त्यांनी ताबडतोब पोलीस प्रमुखांना या प्रकरणी गंभीरपणे चौकशीचे आदेश दिले. पोलिसांनी अनेक इस्पितळाना भेटी देऊन या प्रकरणाची चौकशी सुरु केली आहे. मुळात हा नेमका काय प्रकार आहे याचा उलगडा होऊ शकलेला नाही. परंतु गोव्यात हा प्रकार घडल्याने एकच खळबळ माजलेली आहे.
या संदर्भात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, पोलीस स्थानकावर एक तक्रार आल्यानंतर ताबडतोब पोलिसांनी चौकशी सुरु केलेली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दीड महिन्याचे अर्भक समुद्र किनाऱयावर तरंगून येऊन पडले असावे. त्यानंतर कुत्र्यांनी बहुदा त्यावर हल्ला चढवून त्याचे तुकडे इतरत्र पसरविल्याची शक्यता आहे. आपण या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून याची सखोल चौकशीचा आदेश दिला आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.









