चार ग्रामस्थांचे तहसीलदारांना निवेदन, दखल न घेतल्यास त्याठिकाणी उपोषण
प्रतिनिधी / खेड
तालुक्यातील शिरगाव डुबी नदीपात्रात गाळ उपसण्याच्या नावाखाली अवैधपणे वाळू उपसा सुरू आहे. याबाबत सातत्याने तक्रारी करून देखील अद्याप कोणीच दखल घेतलेली नाही. यापाश्वभूमीवर शिरगाव येथील चार ग्रामस्थांनी मंगळवारी तहसीलदार प्राजक्ता घोरपडे यांना निवेदन सादर करत प्रशासनाने दखल न घेतल्यास वाळू उपसा सुरू असलेल्या ठिकाणी उपोषण छेडण्याचा इशारा दिला आहे.
शिरगाव येथील अंकुश भोसले, प्रकाश भोसले, बापू भोसले, अनिल भोसले यांनी तसे निवेदन दिले आहे. डुबी नदीपात्रात गेल्या १०-१२ दिवसांपासून अवैधपणे वाळू उपसा सुरू आहे. या नदीपात्रात गाळ उपसणारी व्यक्ती गाळाऐवजी जेसीबी लावून वाळू उपसा करत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर याबाबत रितसर तक्रार करण्यात आली. डुबी नदीपात्रात करण्यात आलेल्या वाळू उपसा तक्रारीनंतर पंचनामाही करण्यात आला.
मात्र, पंचनाम्यात वाळूऐवजी मातीमिश्रित वाळू असा शब्द वापरल्याचे नमूद केल्याचा आरोपही केला आहे. नदीपात्रातून गाळ उपसला असल्यास तो कोणत्या क्षेत्रात टाकला गेला? असा प्रश्नही उपस्थित केला आहे. गाळ उपसण्याच्या नावाखाली वाळू उपसा करणान्यांवर रितसर कारवाई न झाल्यास वाळू उपसाठिकाणी आमरण उपोषण छेडणार असल्याचे निवेदनात नमूद केले आहे.









