वार्ताहर / शिये
शिये ता.करवीर येथील विठ्ठल नगरमधील एका ६५ वर्षीय षुरुषाचा कोरोना अहवाल रविवारी सायंकाळी पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे शियेतील कोरोना रुग्णांची संख्या तीन झाली आहे.
शिये फाटा येथे असणार्या क्रशर परिसरात काम करणारा लाटवडेरोड, पेठवडगावचा दिवाणजी कोरोना पॉझिटिव्ह असल्याने त्याच्या संपर्कात आलेला शियेतील क्रशर मजूर सर्वप्रथम पॉझिटिव्ह आला. गुरुवारी गावभागातील एका तरुणाचा अहवाल पॉझिटिव्ह आला.त्यानंतर रविवारी आणखी एका व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. शिवाय शियेत रुग्णांची वाढती संख्या चिंतेची बाब आहे.
ग्रामपंचायतीने गावभाग अगोदरच लॉकडाऊन करून संपूर्ण गावभाग निर्जंतुकीकरण केला आहे.
आता विठ्ठल नगर परिसरात पाच दिवसांसाठी लॉकडाउन करण्यात येणार असल्याचे सरपंच रणजित कदम यांनी सांगितले. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अधिकाऱ्यांनी त्या पॉझिटिव्ह व्यक्तीच्या प्रथम संपर्कातील व्यक्तींना स्वॅब घेण्यासाठी सीपीआर हॉस्पिटलला पाठवले आहे. शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यातील पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे.