पर्यटनमंत्री बाबू आजगावकर यांची माहिती : पणजी, म्हापसा, फोंडय़ात होणार मिरवणूक
प्रतिनिधी /पणजी
कोरोना महामारीमुळे यंदा शिमगोत्सव मिरवणूक केवळ तीन शहरांपुरती मर्यादित करण्यात आली असून ती पणजी, म्हापसा, व फोंडा येथे होणार आहे. पणजी येथे 3 एप्रिल तर म्हापसा येथे 4 एप्रिल रोजी मिरवणूक काढण्यात येणार असून फोंडा येथील तारीख नंतर ठरवली जाणार आहे.
पर्यटनमंत्री बाबू आजगावकर यांनी याबाबत माहिती दिली. त्यांनी पुढे सांगितले की, पर्यटन खात्याने फोंडा आणि म्हापसा या दोनच ठिकाणी शिमगोत्सव आयोजित करण्याचे ठरविले होते. परंतु नंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी राजधानी पणजीतही शिमगोत्सव करण्यास सुचविले. त्यांच्या सूचनेनंतर पणजीचा समावेश शिमगोत्सवात करण्यात आला आहे. आगामी दोन-तीन दिवसांत फोंडा शिमगोत्सवाची तारीख ठरवण्यात येणार असल्याची माहिती मंत्री आजगावकर यांनी दिली.
चित्ररथ. रोमटामेळ, लोकनृत्य आणि वेशभूषा असे चार प्रकार मिरवणुकीत समाविष्ट करण्यात आले असून विजेत्यांना एकूण रु. 5 लाखांपेक्षा अधिक रकमेची बक्षिसे देण्यात येणार आहेत. मिरवणुकीत कोरोनाचे नियम, अटी व एसओपीचे पालन करावे, असे आवाहन मंत्री आजगावकर यांनी केले.
कोरोनाच्या भीतीपोटी सरकारचा निर्णय
संपूर्ण गोव्यात मिळून 15 पेक्षा अधिक ठिकाणी दरवर्षी शिमगोत्सव मोठय़ा धुमधडक्यात साजरा करण्यात येतो. परंतु यंदा 2021 मध्ये कोरोनाचे संकट असल्यामुळे त्याचे स्वरुप मर्यादित करण्यात आले आहे. सर्व ठिकाणी शिमगोत्सवाच्या मिरवणुका काढल्यास कोरोनाचा धोका वाढू शकतो. म्हणून त्याचे स्वरुप 3 ठिकाणांपुरती मर्यादित करण्यात आल्याचे आजगावकर यांनी स्पष्ट केले. त्यामुळे यंदा शिमगोत्सवाचा आनंद निवडक तीन शहरांमध्येच घेता येणार असून इतर शहरे या आनंदाला मुकणार आहे.









