आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी पत्रकार परिषदेत दिली माहिती
प्रतिनिधी / पणजी
गोव्यात कोरोनाचे प्रमाण कितीही वाढले तरी परत लॉकडाऊन केले जाणार नाही. शिमगोत्सव ठरल्याप्रमाणेच होणार असून फक्त कडक शिस्त पाळावी लागणार. गोव्यात येणाऱया प्रत्येक पर्यटकाला कोविड निगेटिव्ह प्रमाणपत्र सक्तीचे करावे असे आपले वैयक्तिक मत असून मुख्य़मंत्र्यांनी मंजुरी दिल्यास लवकरच नवी एस.ओ.पी. जाहीर केली जाईल असे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.
वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सांतईनेज येथील तारांकित हॉटेलात सोमवारी तज्ञ समितीची बैठक झाली. त्यात मंत्री विश्वजित राणे यांच्यासमवेत आरोग्य सचिव रवी धवन, गोमेकॉचे डिन डॉ. शिवानंद बांदेकर, डॉ. राजेश्वर नाईक, गोमेकॉच्या अधीक्षक डॉ. दीपा, डॉ. डिसा आदी उपस्थित होते अशी माहिती त्यांनी दिली.
वाढत्या कोरोनाच्या या काळात शिमगोत्सव होणार की नाही असे तुम्ही आपल्याला विचारणार हे माहित आहे. कडक शिस्त पाळून मास्क वापरुन, सामाजिक अंतर ठेवून शिमगोत्सव होणार असे त्यांनी स्पष्ट केले.
गोव्यात परत लॉकडाऊन होणार का असे त्यांना विचारले असता त्यांनी फक्त नकारार्थी मान हलवली. गोव्यातून महाराष्ट्र, कर्नाटक किंवा केरळ येथे जायचे असल्यास कोविड निगेटिव्ह प्रमाणपत्र न्यावे लागते. त्याचप्रमाणे गोव्यात येणाऱया प्रत्येक पर्यटकाला अशा प्रमाणपत्राची सक्ती करणे आवश्यक आहे असे आपले वैयक्तिक मत आहे. ते मुख्यमंत्र्यांसमोर मांडण्यात आले आहे. त्यांनी मान्यता दिल्यास लगेच हा निर्णय लागू होणार आहे. विमानातून येणाऱया प्रवाशांना तरी ही अट लागू करण्यात यावी यावर या बैठकीत चर्चा झाल्याचे ते म्हणाले.
कोविड चाचणीची गत वाढविण्यासाठी म्हापसा आझिलो इस्पितळ, मडगाव इस्पिसिओ व गोमेकॉत तीन नवी यंत्रे घेतली जाणार अशी माहिती त्यांनी दिली.
दोन मिनिटात हॉटेलला सील
हॉटेलमध्ये एस.ओ.पी पाळली जात नाही असे आढळल्यास अन्न आणि औषध प्रशासनालयामार्फत दोन मिनिटात आपण हॉटेल सील करु शकतो. त्यामुळे प्रसारमाध्यमांच्या मार्फत आपण त्यांना इशारा देऊ इच्छितो हॉटेल मालक आणि चालकांची एक समिती स्थापून त्यांनाच जबाबदारी दिली जाईल. त्यानंतर जे नियम पाळणार नाहीत त्यांचा परवाना रद्द केला जाईल, असे ते म्हणाले.
मास्क न वापरल्यास 500 रु. दंड
सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरता आढळल्यास 200 रु. दंड दिला जातो. दिल्लीत हा दंड ज्या प्रमाणे वाढवण्यात आला आहे त्याप्रमाणे गोव्यात 500 रु. दंड केल्याशिवाय पर्याय नाही. लवकरच या संबंधी एसओपी जाहीर होईल, असे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी जाहीर केले.
वय मर्यादा शिथील
सध्या कोविड प्रतिबंधक लस देण्याचे प्रमाण वाढले आहे. खासगी आस्थापनांना ती जबाबदारी देण्याची इच्छा आहे पण केंद्र सरकार मान्यता देत नाही. गोव्यात सध्या 45 ते 59 वयोमानातील व्यक्तींना लस देण्यात येते ती शिथील करुन अल्पवयीन सोडल्यास सर्वांना लस खुली केली जाईल, अशी माहिती त्यांनी दिली.









