प्रतिनिधी/ खेड
शिमगोत्सवासाठीही रोहा-चिपळूण मार्गावर मेमू सेवा चालवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. त्यानुसार 4 ते 12 मार्चपर्यंत मेमू स्पेशलच्या नियमितपणे 12 फेऱया धावणार आहेत. रेल्वे गाडय़ांना होणारी अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वेने हा निर्णय घेतला आहे.
गणेशोत्सवात रोहा-चिपळूण मार्गावर चालवण्यात आलेल्या मेमू सेवेला प्रवाशांचा उदंड प्रतिसाद लाभला होता. चाकरमान्यांनी शिमगोत्सवातही मेमू स्पेशल चालवण्याची आग्रही मागणी केली होती. विशेषतः जल फाऊंडेशन कोकण विभाग संस्थेने यासाठी सातत्याने पाठपुरावाही केला होता. अखेर रेल्वेगाडय़ांना होणारी प्रवाशांची गर्दी कमी करून सुखकर प्रवासासाठी मध्य रेल्वेने रोहा-चिपळूणदरम्यान 12 मेमू सेवा जाहीर करत चाकरमान्यांच्या सुखद धक्का दिला आहे. त्यानुसार 01597/01598 क्रमांकाचीमेमू रोहा येथून दररोज सकाळी 11.05 वाजता सुटून त्याचदिवशी दुपारी 1.20 वाजता चिपळूण येथे पोहचेल. परतीच्या प्रवासात चिपळूण येथून दुपारी 1.45 वाजता सुटून त्याचदिवशी सायंकाळी 4.10 वाजता रोहा येथे पोहचेल. ही स्पेशल माणगाव, वीर, सापेवामणे, करंजाडी, विन्हेरे, खेड स्थानकात थांबेल.
एलटीटी-करमाळी वातानुकूलित स्पेशल धावणार
शिमगोत्सवासाठी रेल्वे प्रशासनाने एलटीटी-करमाळी वातानुकूलित स्पेशल चालवण्याचा निर्णय घेतला आहे. 01187/01188 क्रमांकाची लोकमान्य टिळक टर्मिनस-करमाळी स्पेशल 2 व 9 मार्च रोजी व परतीच्या प्रवासात 3 व 10 मार्च रोजी धावेल. या स्पेशलचे बुधवारपासून आरक्षण खुले झाले आहे. ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डे, संगमेश्वर, आडवली, राजापूर, वैभववाडी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी, थिविम आदी स्थानकात थांबे आहेत.









