पावसमध्ये होळी अंगावर पडून प्रौढाचा मृत्यू : संगमेश्वरात ढोल वाजवल्यानंतर माजी सैनिकाचा ह्दयविकाराने मृत्यू
प्रतिनिधी / रत्नागिरी, संगमेश्वर
जिल्हय़ात दोघांच्या झालेल्या आकस्मिक मृत्यूमुळे ऐन शिमगोत्सवात गालबोट लागले आहे. तालुक्यातील पावस नवलाई देवी मंदिर या ठिकाणी होळी अंगावर पडून प्रौढाचा मृत्यू झाल़ा चंद्रकांत नारायण सलपे (54, नालेवठार धनगरवाडी) असे मृताचे नाव आह़े तर दुसऱया घटनेत संगमेश्वरात असुर्डे गावच्या होलिकोत्सवादरम्यान भरपूर वेळ ढोल वाजवल्यानंतर बसलेल्या माजी सैनिक सहदेव रामचंद्र लाड (68) यांचा ह्दयविकाराने मृत्यू झाला. ऐन उत्सवात घडलेल्या या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे.
या बाबत पूर्णगड पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री 12 वाजता चंद्रकांत सलपे हे पावसच्या नवलाई देवी मंदिरासमोरील सहाणेवर गेले होत़े येथे परंपरेनुसार सूरमाडाची होळी उभी करण्याचा कार्यक्रम सुरू होत़ा यामध्ये ते सहभागी झाले होत़े होळी उभी करण्यासाठी कैचीचे स्टँड उभे केले होत़े होळी उभी करताना अचानक लोखंडी कैचीचा नटबोल्ट निसटून होळीचा आधार सुटल़ा यामुळे होळी थेट खाली उभ्या असलेल्या गावकऱयांच्या अंगावर आल़ी यामध्ये चंद्रकांत सलपे यांच्या अंगावर होळी पडून त्यांना गंभीर दुखापत झाल़ी त्यांना तातडीने रत्नागिरी जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल़े यावेळी वैद्यकीय अधिकाऱयांनी त्यांना तपासून मृत घोषित केल़े त्यांच्या पश्चात दोन विवाहित मुलगे, सुना असा परिवार आहे. या घटनेची खबर संदीप रामचंद्र सलपे यांनी पूर्णगड पोलीस ठाण्यात दिल़ी त्यानुसार पोलिसांनी पंचनामा करून आकस्मिक मृत्यूची नेंद केली आह़े पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल संदीप चव्हाण करत आहेत़
असुर्डे गावावर दुःखाची छाया
संगमेश्वर तालुक्यातील असुर्डे गावचे रहिवासी व माजी सैनिक सहदेव रामचंद्र लाड यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. असुर्डे गावच्या होलिकोत्सवादरम्यान हा सण साजरा करत असतानाच ही दुर्दैवी घटना घडल्याने परिसरात दुःखाची छाया पसरली आहे. असुर्डे गावच्या शिमगोत्सवात त्यांनी गावकऱयांसोबत माड आणला. भक्तगण पालखी नाचवत असतांना लाड सहकाऱयांसोबत खूप वेळ ढोल वाजवत होते. पालखी सहाणेवर बसल्यानंतर ढोल वाजवणे बंद झाले आणि लाड हे विश्रांतीसाठी बसले. शेजारी बसलेल्या माणसांसोबत बोलत असतानाच त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका येवून कोसळले व त्यांचा जागीच मृत्यू झाला. उपचारांसाठी दवाखान्यात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या पश्चात पत्नी, 2 विवाहित मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
लाड यांना विविध शौर्यपदके प्राप्त
लाड हे सैन्यदलात दाखल झाल्यानंतर त्यांनी आपल्या अंगी असणाऱया अन्य कला-कौशल्यांच्या सहाय्याने स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली होती. सैन्यात सेवा करताना लाड यांना विविध शौर्यपदकेही प्राप्त झाली होती. सैन्यदलातून निवृत्त झाल्यानंतर सहदेव लाड हे एन्रॉन येथे व त्यानंतर भारत संचार निगम संगमेश्वर कार्यालयात सुरक्षारक्षक म्हणून सेवेत होते. पॅब्रीकेशन, गवंडीकाम, सुतारकाम अशा विविध कलाही त्यांना अवगत होत्या. भजनाची त्यांना विशेष आवड होती.









