कॅप्टन विलास राणे आडेली गावाचे सुपुत्र : प्रतिकूल परिस्थितीवर मात करुन सैन्यदलात भरती होऊन केली देशसेवा
भरत सातोस्कर / वेंगुर्ले:
एकीकडे कोवळय़ा वयात आई आपल्या मुलांचे लाड, हट्ट पुरविते. स्वतःला हव्या-हव्या वाटणाऱया प्रत्येक गोष्टीची ती आपल्या लाडक्मया मुलांसाठी तिलांजली देते. तर दुसरीकडे एक निरागस चेहरा आपणाला भारतमातेची सेवा करायची आहे म्हणून आईसमोर हट्ट धरतो. एकीकडे देश तर दुसरीकडे आपला कोवळा मुलगा यापैकी कोणता निर्णय घ्यायचा. अशा द्विधा मनस्थितीत शेवटी देशसेवेपुढे आईची माया कमी पडते, आणि आपल्या लाडक्मया निरागस बाळाला देशसेवा करायला ती जननी परवानगी देते. देशसेवेचे स्वप्न पाहणारे आडेली-राणेवाडीचे सुपुत्र विलास वासुदेव राणे यांनी सैन्यदलातील यशस्वी कामगिरीच्या जोरावर शिपाई ते कॅप्टनपदापर्यंत पोहोचले. घरच्या हालाखीच्या परिस्थितीवर मात करुन त्यांनी देशसेवेसाठी दिलेले योगदान अभिमानास्पद आहे.
सन 1971 मध्ये झालेल्या भारत-पाक लढाईच्या बातम्या रेडिओच्या माध्यमातून ऐकणारा व युद्धावेळी आकाशात घिरटय़ा घालणारी विमाने पाहणारा आडेली-राणेवाडी येथील विलास वासुदेव राणे हे सैन्यातील टप्प्याटप्प्याने उत्कृष्ट कामगिरीनुसार मिळणारी बढतीची पदे मिळवत कॅप्टन म्हणून सेवानिवृत्त झाले. त्यांच्या सैन्यदलातील भरीव कामगिरीने प्रोत्साहन घेऊन त्यांच्या दोन भावांनाही भारतमातेची सेवा करण्याचे भाग्य लाभले. इतकेच नव्हे, तर त्यापाठोपाठ त्यांच्या पुतण्यांनीसुद्धा देशसेवेचे ब्रिद अवलंबिले. विशेष म्हणजे सह भावांसहित एकूण 43 सदस्यांचे हे राणे कुटुंबीय आजही एकत्रित कुटुंब म्हणून आडेली राणेवाडीतच नाही तर तालुक्मयात प्रसिद्ध आहे. त्या पलीकडेही आई-वडिलांच्या प्रेमाला पोरके झालेले हे कुटुंब आज सुखात नांदत आहे. या कुटुंबाचा मजबूत पाया म्हणजेच कॅप्टन विलास राणे हेच होय.
सैनिकाचीच नोकरी करण्याची जिद्द
कॅप्टन विलास वासुदेव राणे यांचे शिक्षण मठ हायस्कूलमध्ये दहावीपर्यंत झाले. नंतर 1971 मध्ये भारत-पाक युद्धाच्या बातम्या रेडिओवर ऐकून आणि भारतीय जवानांनी त्यावेळी केलेली उत्कृष्ट कामगिरी ऐकून आपणही सैनिक व्हावे. ही महत्वाकांक्षा बाळगलेल्या विलास राणे यांना घरच्या परीस्थितीमुळे ते शक्मय होत नव्हते. पण ‘नोकरी करीन तर सैनिकाचीच’ ही जिद्द बाळगलेल्या राणे यांना त्यांच्या आईचा विरोध असतानाही लग्न होऊन बेळगाव येथे रहाणाऱया मोठय़ा बहिणीने (पार्वती महादेव सावंत- पूर्वाश्रमीची शालिनी राणे) हिने मोलाची साथ दिली. त्यावेळी बेळगांवमध्ये सैनिक भरती व्हायची. सैन्यात नोकरी करण्याचा हट्ट पाहून आई प्रभावती राणे हिने परवानगी दिली खरी, पण नोकरीसाठी जाण्या-येण्याचा खर्च तिला परवडणारा नव्हता. तिने स्वतः लागवड केलेले बांबू विकून जाण्यासाठी 10 रूपये दिले आणि 1980 मध्ये वेंगुर्ल्याहून बेळगांवपर्यंतचे तिकीट 6 रुपये 90 पैसे होते. त्यापैशातून ते बेळगावला पोहचले. सैन्य भरतीसाठी कसून सराव केल्यानंतर देशसेवेचे स्वप्न पूर्ण झाले.
राणे म्हणाले, 2 एप्रिल 1980 मध्ये प्रशिक्षणासाठी मराठा रेजिमेंट टेनिंग सेंटरमध्ये तैनात झालो. तिथे प्रशिक्षणांतर्गत सैनिकांच्या प्रशिक्षण कंपन्या असलेल्या अल्फा, ब्राओ, चार्ली, डेल्टा, इको यापैकी डेल्टामध्ये रुजू झालो. या कंपन्या प्रशिक्षण देऊन खरे सैनिक योद्धे घडवितात. खडतर प्रशिक्षणानंतर 17 मराठा या पलटणमध्ये शिपाई या पदावर रूजू झालो.
उत्कृष्ट कार्याबद्दल सुभेदारपदी बढती
1982 मध्ये राजस्थानमधील श्रीगंगानगर येथे माझी बदली झाली. सेनेतील परीक्षा देऊन 1986 मध्ये नाईक पद मिळाले. 1988 साली बढती मिळून हवालदार हे पद मिळाले. 17 मराठा फलटणला 25 वर्षे झाल्याबद्दल रौप्य महोत्सव साजरा करण्यात आला. त्यावेळी अधिकारी, निवृत्त जवान, राष्ट्रध्वज घेऊन परेड, मल्लखांब, गोमूगौरी असे विविध प्रकारचे सांघिक आणि मनोरंजन खेळ झाले. 5 जानेवारी 1989 ला भारतीय शांतीसेने सोबत श्रीलंकेला जाण्याचा योगायोग आला. आमच्या पहिल्याच लढाईत एल.टी.टी.ई.चा लिडर तुंबन मारला गेला. आपल्या गटातील म्होरक्मया मारला गेल्यामुळे एल.टी.टी.ई.चे बाकी आतंकवादी पळून गेले. या लढाईत ईश्वरी कृपेने आपल्या देशातील कोणत्याही सैनिकांस दुखापत झाली नाही. या ठिकाणी आम्ही दोन वर्षे आमने-सामनेच्या लढाईसाठी थांबलो. या कालावधीत आम्ही एल.टी.टी.ई.चे 15 आतंकवादी मारले. पण आमचे चार योद्धे धारातीर्थी पडले. रामा गावडे, विलास शिलारेंसह अजून दोन शूरवीर शहिद झाले. दोन वर्षानंतर 1990 मध्ये आम्ही केरळमधील त्रिवेंद्रमला आलो. तेथे दीड वर्षे राहिल्यानंतर पुन्हा 1993 मध्ये अरुणाचलमधील तवांग (चायना बॉर्डर) येथे नियुक्ती झाली. याच कालावधीत माझ्या अपार मेहनीतीचे फळ म्हणून मला नायब सुभेदार या अधिकारी पदावर बढती मिळाली. बेळगांवमध्ये भावी सैनिकांना प्रशिक्षणाच्या चार वर्षांच्या सेवेनंतर पुन्हा आपल्या 17 मराठा या पलटणला 1997 साली जम्मू काश्मीरमधील सुरणकोट येथे पाठविण्यात आले. याच ठिकाणी माझ्या सेनेतील उत्कृष्ट कार्याबद्दल सुभेदारपदी बढती मिळाली.
56 आतंकवादय़ांना कंठस्नान!
सुरणकोट म्हणजे ज्याला मिनीपाकिस्तान म्हणून ओळखले जाते. याचवेळी ऑपेरेशन विजय म्हणजेच कारगिल युद्ध सुरु झाले. या तीन वर्षांच्या कालावधीमध्ये आम्ही एकूण 53 आतंकवाद्यांना कंठस्नान घातले. पण दरम्यान आमचे 4 जवान शहिद झाले. त्यात दिलीप मावळे, दिलीप केंदे, कृष्णा समरीत आणि केरबा जाधव यांना आम्ही गमावले. तेथून पुढे माझी नियुक्ती राजोरी सेक्टरमधील 27 राष्ट्रीय रायफल (मराठा) मध्ये झाली. याचवेळी दिल्ली येथील संसदेवर हल्ला झाला. त्यावेळी आपल्याला पंजाबमधील कपूरथला येथे पाकिस्तानच्या सीमेवर तैनात करण्यात आले.
ओनररी लेफ्टनंट पदावर पदोन्नती
2006 मध्ये मला सुभेदार मेजर या पदावर पदोन्नती मिळाली. त्यामुळे मला मुलींना प्रशिक्षण देण्यासाठी ओरिसाची राजधानी भुवनेश्वर येथे पाठविण्यात आले. याठिकाणी चार वर्षांच्या काळात मुलींना प्रशिक्षण दिले. याच ठिकाणी 15 ऑगस्ट 2010 मध्ये ओनररी लेफ्टनंट या मानाच्या पदावर पदोन्नती मिळाली. हा आनंदी क्षण माझ्या कुटुंबियांसाठी खूप अनमोल असा होता. ज्या माझ्या बहिणीने माझ्यासाठी सर्व काही केले. जिच्यामुळं मी इथेपर्यंत पोहचलो, तिलाच पहिली ही आनंदाची बातमी दिली. नोव्हेंबर 2010 मध्ये मी नोकरीची 32 वर्षे पूर्ण करून निवृत्त झालो. 26 जानेवारी 2011 मध्ये मला कॅप्टन या पदाने सन्मानित करण्यात आले. याच ठिकाणी त्यांच्या भारतीय सेनेतील नोकरीला पूर्ण विराम लागला.
सेवानिवृत्तीनंतर सामाजिक कार्यात सहभाग
कॅप्टन विलास राणे हे सेवानिवृत्ती झाल्यानंतर आडेली गावातील दानशूर व्यक्तीच्या मदतीने आडेली हायस्कूलमधील गरजू विद्यार्थ्यांना सायकल वाटप, मोफत वहय़ा वाटप, गावातील मंदिरांची रंगरंगोटीचे काम, धार्मिक कार्यक्रम आणि गरजूंना आर्थिक मदत करण्यासाठी ते पुढाकार ते घेत आहेत.









