वार्ताहर / कुद्रेमनी
बेळगाव आणि चंदगड तालुक्मयांच्या कर्नाटक-महाराष्ट्र सीमाहद्दीवर असलेल्या बाची गावाजवळील चेकपोस्टवर कोविड आरटीपीसीआर अहवालाची तपासणी करण्यात येत असून शासनाचा आदेश येईपर्यंत ही तपासणी चालूच राहणार आहे.
सध्या चेकपोस्टवर कर्नाटक पोलीस 24 तास तैनात असून अहवालाची तपासणी केली जात आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लसीकरण अहवाल असणाऱयांना बेळगावकडे ये-जा करण्याची मुभा दिली जात आहे. गोवा, वेंगुर्ला किंवा चंदगड भागातून बेळगावकडे येणाऱया वाहनधारकांना अडवून आरटीपीसीआर अहवालाची तपासणी करूनच त्यांना पुढे सोडण्यात येत आहे. अहवाल उपलब्ध नसल्यास प्रवेशबंदीचा नियम लागू आहे. त्यामुळे परराज्यांतून किंवा दूरवरून येणाऱया प्रवाशांकडे आरटीपीसीआर अहवाल उपलब्ध असणे अनिवार्य झाले आहे.
सीमाहद्दीच्या जवळपास असलेल्या देवरवाडी, शिनोळी, महिपाळगड, तुर्केवाडी, कुदेमनी आदी गावच्या नागरिकांना नेहमी नोकरी, व्यवसाय तसेच बाजारहाट आणि शेतीमाल घेऊन बेळगावला ये-जा करावी लागते. विविध कामांसाठीही बेळगावला जावे लागते. त्यामुळे स्थानिक नागरिकांना या चेकपोस्टवरून सोडण्यात येत आहे. चंदगडमार्गे बेळगावकडे धावणाऱया महाराष्ट्र परिवहन मंडळाच्या बस अद्याप सदर चेकपोस्टवरून पुढे बेळगावकडे जाण्यास अजूनही बंदी आहे. त्यामुळे चंदगड बस आगाराच्या सर्वच बसेस शिनोळी येथील कर्नाटक-महाराष्ट्र सीमाहद्दीवरील कमानीजवळ महाराष्ट्र हद्दीतच थांबतात. यामुळे शिनोळी फाटय़ापासून बेळगावकडे जाणाऱया प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे त्यांना मिळेल त्या वाहनाचा आधार घेऊन बेळगावकडे यावे लागत आहे.
प्रवासीवर्ग बससेवेच्या प्रतीक्षेत
बेळगाव बस आगाराच्या चंदगड तालुक्मयातील देवरवाडी, महिपाळगड गावच्या बस अद्याप बंदच आहेत. सायंकाळी बेळगावहून बाची गावापर्यंत अलीकडेच बस सोडण्यात आलेली आहे. तसेच कुदेमनी गावची बससेवा सुरळीत झालेली आहे. त्यामुळे सर्रास नागरिकांना व प्रवाशांना या बसची वाट पाहात बसावे लागते. परिणामी बसमध्ये गर्दी होत आहे. शाळेला किंवा महाविद्यालयीन शिक्षणासाठी जाणाऱया विद्यार्थी तसेच नागरिकांना बसमधील गर्दीतून प्रवास करावा लागत आहे. चंदगड-बेळगाव बससेवा बंद असल्यामुळे चंदगड भागात रात्रीच्या वेळी ये-जा करणे कठीण झाले आहे. त्यामुळे पूर्ववत बससेवा कधी सुरू होणार, या प्रतीक्षेत प्रवासीवर्ग आहे.









