कर्नाटक-महाराष्ट्र आंतरराज्य बससेवा ठप्पच : प्रवासीवर्गाची काही दिवसांपासून गैरसोय
प्रतिनिधी /बेळगाव
कोरोनामुळे मागील काही महिन्यांपासून कर्नाटक-महाराष्ट्र आंतरराज्य बससेवा ठप्प झाली आहे. त्यामुळे आंतरराज्य प्रवास करणाऱया प्रवाशांची मोठी गैरसोय होताना दिसत आहे. महाराष्ट्राची लालपरी कर्नाटकच्या सीमाहद्दीपर्यंत धावत आहे. मात्र कर्नाटकात अद्याप एन्ट्री झाली नाही. याबरोबरच बेळगाव, कोकण बससेवादेखील ठप्प आहे. मात्र सीमाहद्दीवरील शिनोळीपासून लालपरी कोकणात सुसाट धावताना दिसत आहे.
कोरोनाआधी बेळगाव बसस्थानकातून कोकणातील सावंतवाडी, वेंगुर्ला, राजापूर, मालवण, रेड्डी आदी भागात दैनंदिन बस धावत होत्या. त्यामुळे कोकणसह सीमाभागातील प्रवाशांची चांगलीच सोय व्हायची. मात्र मागील काही दिवसांपासून बेळगाव-कोकण बससेवा ठप्प झाल्याने प्रवाशांना खासगी वाहनांचा आधार घेत इच्छित स्थळी पोहोचावे लागत आहे. त्यामुळे काही वेळा खासगी वाहनधारकांकडून आर्थिक लूटही होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. दरम्यान, बेळगावातील प्रवाशांना कोकणात जायचे असल्यास खासगी वाहनाने शिनोळी, ता. चंदगड गाठावे लागत आहे आणि तेथून पुढचा प्रवास करण्यासाठी महाराष्ट्र एसटीचा आधार घ्यावा लागत आहे.
कर्नाटक-महाराष्ट्र सीमाहद्दीवर कोरोना चाचणी सक्तीची करण्यात आल्याने प्रवाशांची संख्या थंडावली आहे. दरम्यान बेळगावात येणारी महाराष्ट्राची लालपरी थांबली आहे. तर कर्नाटकच्या काही मोजक्मया बस महाराष्ट्रात धावत आहेत. त्यामुळे प्रवासीवर्गाची मागील काही दिवसांपासून गैरसोय होत आहे.
आरटीपीसीआर अद्याप बंधनकारक
कोरोनाला रोखण्यासाठी मागील काही महिन्यांपासून कर्नाटक-महाराष्ट्र सीमाहद्दीवर चेकपोस्ट उभारण्यात आले आहेत. या ठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव काही प्रमाणात कमी झाला असला तरी प्रवाशांसाठी आरटीपीसीआर अद्याप बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे शासनाच्या बससह खासगी वाहनाने प्रवास करणाऱया प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे कर्नाटक शासनाच्या या नियमाविषयी नाराजी व्यक्त होत आहे.









