महामुनी शुकदेव परिक्षिती राजाला बाणासुराची कथा सांगताना पुढे म्हणतात-
अनिरुद्ध आपल्यामुळेच या संकटात सापडला आहे असे वाटल्याने उषेला पश्चात्ताप होत होता व ती उद्वेगाने आपले कपाळ पिटून आक्रोश करीत होती. आता आपल्याला व अनिरुद्धाला या संकटातून कोण वाचवणार याची चिंता तिला लागली होती. त्याचवेळी तिची परमसखी चित्रलेखा तिथे आली. तिने उषेला धीर देताना म्हटले-उषे! तू काही काळजी करू नकोस.
ज्या अंबिकेने तुला हा वर दिला तीच आता याचे रक्षण करील. तू जगदंबेचे मनापासून चिंतन मनन मात्र करत रहा. त्यानंतर चित्रलेखेने काही मंतरलेली विभुती अनिरुद्धाच्या मस्तकी लावली व ती तेथून कुणालाही कळू न देता हळूच निघून गेली. त्या विभुतीच्या प्रभावाने अनिरुद्धाला वेढलेल्या नागबंधाचा पाश थोडा सैल झाला. तो श्वासोच्छ्वास घेऊ लागला. त्याचे प्राणसंकट टळले व तो निद्रावस्थेत पडून राहिला. आता इकडे द्वारकेत काय झाले, ते पाहू.
चित्रलेखेनें अनिरुद्ध नेला । प्रभाते सदनीं गलबला झाला । रामकृष्णादि प्रद्युम्नाला । वृत्तान्त कथिला किङ्करिं । रति रुक्मिणी रुक्मवती । रोहिणी देवकीसह रेवती । रोचनेच्या सदना येती । वृत्तान्त पुसती तयेतें । येरी म्हणे त्रिदिनव्रत । व्रतस्थ होते कीर्तनिरत । म्हणोनि मजला हें अबिदित। नव्हता एकान्तसुखशयनीं । किङ्कर म्हणती सभास्थानीं । अर्धरात्री क्रमिली श्रवणीं । कीर्तन संपतां मंचकासनीं। स्वेच्छा शयनीं पहुडलिया। निद्रित झाले सेवक सर्व । प्रभाते वर्तलें अपूर्व । मंचकासहित रोचनाधव । नेला लाघव करूनियां । कोणें नेला ऐसें न कळे । पिहित द्वारें असतां सकळें ।
हें ऐकतां यादवकुळें । झालीं व्याकुळें सर्वत्र ।
न देखतां अनिरुद्धातें । समस्त बंधुवर्गाचीं चित्तें ।
झालीं अत्यंत शोकभरितें । शुद्धि कोणातें तर्केना।
प्रसूतिकाळीं प्रद्युम्नासी । शंबरें नेलें वधावयासी ।
दैवें रक्षिलें तेथ त्यासी । हेही तैसीच गोष्टी गमे ।
ऐसें अनेक तर्क करिती । एक दैवज्ञा पूसती ।
देवदेव्हारें धुंडिती । घालूनि विनती आरतिया ।
रोचनेचा शोक भारी । भोंवत्या आश्वासिती नारी।
गद प्रद्युम्न राम मुरारी । बाष्पें नेत्रीं ढाळिती ।
देवकी रोहिणी रेवती । रुक्मिणीसहित रुक्मवती।
परमाक्रोशें आक्रंदती। आंगें टाकिती धरणीये । नेणती सगुण हे रोचना। कांतेंवीण दीनवदना । कैसी कंठील अहर्गणा । म्हणोनि ललना विलपती ।
तिये समयीं उद्धवाक्रूर। समस्तांतें देती धीर। म्हणती सावध स्थिर स्थिर । दीर्घ विचार करा म्हणती। तेव्हां रायें उग्रसेनें । अनिरुद्धाचे गवेपणे। चार प्रेरूनि वनोपवनें । द्वीपें भुवनें शोधविलीं । ब्राह्मण घातले अनु÷ानीं । एक व्रतस्थ बैसले मौनी। एक हरिहरदेवतायतनीं । नियमेंकरूनि राहिले । एक अश्वत्था प्रदक्षिणा । एक तुळसीवृंदावना । एक ते सूर्यनारायणा । अर्घ्यदानें तोषविती । अनिरुद्धाचा विसर न पडे । दु:खें यादव झाले वेडे । रुक्मवती सदैव रडे । रोचनेकडे पाहूनी ।
Ad. देवदत्त परुळेकर








