नव्या वर्षाच्या प्रारंभी म्हणजे जानेवारीपासूनच केरोनाने जगाला ग्रासले आहे. त्यातही गेल्या दोन महिन्यांत संपूर्ण जगाची कळा गेली आहे. सगळय़ा महासत्ता गडगडल्या, गडबडल्या. जगातील सर्वात गर्दीच्या पंधरा शहरांमध्ये आज स्मशान शांतता आहे. जगभर लोक जखडलेले आयुष्य जगत आहेत. घरात राहूया आणि कोरोनाला हटवूया हे जगभराच्या कोरोनाविरोधी लढाईचे ब्रीद झालेले आहे. पण, आता हे ‘लॉकडाऊन’ शिथिल व्हायला सुरूवातही झाली आहे. प्रत्येक व्यक्तीला स्वतःचे स्वातंत्र्य प्रिय आहे. पण, कोरोनाने या स्वातंत्र्यावर अप्रत्यक्ष बंधने लादली. त्याला ज्यांनी सकारात्मकतेने घेतले त्यांनी तो कुटुंबाशी जोडून घेण्याचा, स्वतःला जाणण्याचा काळ समजला. पण, मनाला असे कितीही समजावले तरीही माणसाची मूळ वृत्ती एकाठिकाणी स्वतःला कोंडून घेणारी नाहीच. त्यामुळे ठिकठिकाणी या लॉकडाऊनला वळसा घालून लोक बाहेर डोकावलेच. त्याला काही ना काही निमित्तही मिळत गेले. परिणामी पोलीस बळही सक्रीय झाले. जगभरातले पोलिसी मारहाणीचे व्हीडिओही प्रसारित झाले. संपूर्ण जगात या ‘लॉकडाऊन’ने मने अस्वस्थ आहेत. मधे मधे दिलासा म्हणून अमेरिकेची दारे किलकिली झाली, वुहान शहराचे वातावरण पुन्हा पूर्वीसारखे झाले आहे अशी सचित्र माहिती प्रसारित होते. भारतात लोकांनी आता कितीसे दिवस घरात थांबायचे आहे? हे संकट टळणारच आहे. फक्त त्यासाठी थोडे थांबायला हरकत नाही अशी मनाची समजूतही काढली. विविध राज्यातील सरकारांनी लॉकडाऊनमध्येही जेथे कोरोनाचा फारसा प्रभाव नाही अशा गाव, शहरांमध्ये थोडी मोकळीक ठेवली गेली. ठरावीक वेळांमध्ये व्यायाम, खरेदीच्या निमित्तानेही अनेक ठिकाणी लोकांना मोकळा श्वास घेता आला. ज्या भागांमध्ये कोरोनाचा फटका मोठय़ा प्रमाणावर बसला आहे तेथे आणि त्याच्या आसपासच्या भागात कडक अंमलबजावणी झाली. जिल्हय़ांच्या सीमा सील केल्याने वर्दळ जवळपास थांबलीच. पुढे लोकांनी स्वतःहून बाहेर पडणेही बंद केले. पण, आता एप्रिलचा दुसरा आठवडा सुरू झाला आहे आणि या आठवडय़ात ‘लॉकडाऊन’ शिथिल झालेच पाहिजे अशी लोकभावना वाढीस लागण्यास सुरूवात झालेली आहे. त्याला जगभराचे दाखलेही दिले जाऊ लागले आहेत. कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या इटली, चीन, अमेरिकेसारख्या देशांमध्ये शाळा, सार्वजनिक वाहतूक, चित्रपटगृहे, बहुमजली बाजार यांच्यावरील निर्बंध मागे घेतले आहेत. वॉलमार्टसारख्या कंपनीने मर्यादित ग्राहकांना बाजारात प्रवेश देण्याचे धोरण ठेवले आहे. गल्ला सांभाळणाऱया कर्मचाऱयांना काचेच्या पेटीत बसवून व्यवहार सुरू केले आहेत. या बाजारात लोकांची संख्या काही झाले तरी वाढणार नाही याची काळजी घेतली जात आहे. प्रत्येक व्यक्तीच्या शरीराचे तपमान मोजून नंतरच त्याला आत प्रवेश द्यायचा किंवा नाही याचा निर्णय घेतला जात आहे. आयर्लंडसह अनेक देशांमध्ये चित्रपटगृहेही सुरू झाली आहेत. एक खुर्चीचे अंतर ठेऊन लोकांना बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. 50 टक्केच तिकीट विक्री करण्याचे बंधन घालून आणि प्रत्येक खेळानंतर सॅनिटायझरने स्वच्छता करूनच दुसऱया खेळाला लोकांना प्रवेश दिला जात आहे. चीनमध्ये शाळा, कॉलेज सुरू झाले आहेत. एका वर्गात 30 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जात नाही. दिवसातून तीनदा विद्यार्थ्यांच्या शरीराचे तपमान तपासायचे, शिक्षकांचीही तपासणी करायची, विद्यार्थ्यांचा आपापसात कमीत कमी संपर्क व्हावा आणि संक्रमण रोखले जावे यासाठी असे अनेक कठोर नियम लादले गेले आहेत. वुहान शहरही आता मर्यादित मोकळा श्वास घेत आहे. प्रत्येकाला मास्क वापरणे बंधनकारक आहे. क्युआरकोड व्दारे व्यक्तीच्या नेंदणीची तपासणी आणि रोबोट, सुरक्षा रक्षकांच्या निगराणीखाली रेल्वेप्रवास करू दिला जात आहे. उर्वरित चीनचा सर्वाधिक प्रभाव ज्या हॉंगकाँग आणि तैवानवर पडू शकतो तिथेही अशाच कठोर नियमावलींसह शिथिलता आणली जात आहे. रोबोटव्दारे साफसफाईपासून व्यक्तींची तपासणी करण्यावरही भर दिला जात आहे. जगभर चाललेल्या या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भारतातही लोकांना आता मोकळीक हवीहवीशी वाटू लागली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची याबाबतची भूमिका पूर्णतः स्पष्ट नसली तरी विविध राज्यांचा बंधने शिथिल करण्याबाबत दबाव वाढत आहे. महाराष्ट्राच्या आरोग्यमंत्र्यांनी मात्र आणखी काही काळ लॉकडाऊनची गरज बोलून दाखविली आहे. पण, इथेही ज्या शहर, गावांमध्ये संक्रमण नाही तिथे नियमात शिथिलता आणावी, लोकांना मोकळीक द्यावी, गर्दीच्या ठिकाणांवर नियंत्रण रहावे मात्र शिथिलता आणावी अशी मागणी होत आहे. अर्थात आता जगाला या संक्रमणाची आणि त्याच्या परिणामाची पुरेशी जाणीव झालेली आहे. मुंबई सारख्या शहरात वाढता आकडा आणि वाढते हॉटस्पॉट हा चिंतेचा विषय आहे. लोकांना मुंबईत प्रवेश करू द्यायचा का नाही, दाट लोकवस्तीच्या झोपडपट्टय़ांमध्ये संक्रमणाला नियंत्रणात कसे ठेवावे हा फार मोठा आव्हानाचा विषय आहे. मुंबई शहराची लोकसंख्या, तपमान आणि तिथल्या सुविधांचा अभाव लक्षात घेता जितके संक्रमण वाढेल अशी भीती व्यक्त केली जात होती त्यापेक्षा आजपर्यंत तरी मुंबईत कोरोना नियंत्रणात आहे असेच म्हणावे लागेल. मात्र हे संक्रमण वाढू नये यासाठी तिथे काटेकोर अंमलबजावणीची आवश्यकता आहेच. चेन तुटली आहे असे लोकांनी स्वतः म्हणून उपयोगाचे नाही. यंत्रणांना जेव्हा तसे वाटेल तेव्हाच ते मत म्हणून पुढे आले पाहिजे. वास्तविक दररोज रूग्णांची वाढती संख्या हा गांभिर्यानेच घ्यायचा विषय आहे. जग शिथिल होत असले तरी त्यांच्याकडे भारताच्या खूप आधी संक्रमण झाले होते हेही लक्षात घेतले पाहिजे. शासनापुढची जटिल परिस्थिती आणि लोकभावना या दोन्हीचा विचार करून संक्रमण नाही अशा भागात शक्य तेथे मर्यादित शिथिलता आणता येईल का, सलगच्या गावांपुरता प्रवास आणि संचाराला परवानगी द्यावी का याबद्दलचा विचार शासनाने करणे गरजेचे आहेच. त्याचवेळी काही भागांमध्ये ही मुदत वाढवावी लागली तर ती परिस्थितीची गरज म्हणून स्वीकारण्याची तयारी जनतेनेही ठेवण्याची आवश्यकता आहे.
Previous Articleवॉव
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.








