ग्लोबल टीचर्स पुरस्कार विजेते रणजितसिंह डिसले यांचे प्रतिपादन
प्रतिनिधी / कोल्हापूर
युरोपियन देशात विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेनुसार शिक्षण दिले जाते. जगातील बदलते तंत्रज्ञान स्विकारून शिक्षण पध्दतीत बदल केले जातात. भारतातील पारंपारिक शिक्षण पध्दती आणि परीक्षेचे मूल्यमापन विद्यार्थ्यांसाठी अन्यायकारक आहे. त्यामुळे बदलत्या तंत्रज्ञानानुसार शिक्षकांनी शिक्षण व मूल्यमापन पध्दतीत बदल करावे, असे प्रतिपादन ग्लोबल टिचर पुरस्कार विजेते रणजितसिंह डिसले यांनी केले.
स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या वतीने छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते `शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे आदर्श शिक्षक पुरस्कार’ डिसले यांना प्रदान करण्यात आला. हा कार्यक्रम संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांच्या वाढदिवसानिमित्त घेण्यात आला. याप्रसंगी अभय रिसर्च ऍन्ड डेव्हलपमेंट सेंटरचे उद्घाटन करण्यात आले. अभयकुमार साळुंखे यांनी आपल्या पेन्शनच्या रकमेतून `विद्यार्थी आपत्कालिन निधी’ची तरतूद केल्याची घोषणा करण्यात आली. अध्यक्षस्थानी छत्रपती शाहू महाराज होते.
डिसले म्हणाले, टिचर्स एक्सलन्स सेंटरची स्थापना करून शिक्षकांच्या व्यवसायिक गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न केले पाहिजेत. गुगल आणि मायक्रोसॉफ्टचे सदस्यत्व शिक्षकांना देवून प्रशिक्षीत केले पाहिजे. त्याचा फायदा संस्था, विद्यार्थी आणि शिक्षकांना होईल. शिक्षक संघटनांनीही जागतिक पातळीवर बुध्दी, कौशल्याची देवाण-घेवाण केली पाहिजे. शिक्षकांनी संपूर्ण जगाकडे क्लासरूम माणूनच शिक्षण दिले पाहिजे. नाविण्यता आणि सृजनशिलतेच्या जोरावर आंतरराष्ट्रीय पुरस्कार विजेते व्हाल. विद्यार्थ्यांना व्हर्चुअल क्लासरूमच्या माध्यमातून जगभराची सैर करून, ऐतिहासिक गडकिल्ल्यांच्या संवर्धनाचे महत्व तेथील गाईडच्या माध्यमातून समजावून सांगा. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जागतिकीकरणात टिकण्यासाठीचे पूरक शिक्षण विद्यार्थ्यांना द्या.
ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर म्हणाले, शिक्षणाच्या बदलत्या दिशेनुसार आणि नवीन तंत्रज्ञानानुसार शिक्षण पध्दत बदलण्याची गरज आहे. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेनुसार शिक्षण दिले तर देश विकसित बनेल. शिक्षणात नवीन्यता, सृजनशिलता असेल तर विद्यार्थ्यांच्या अंतर्गत गुणांचा विकास होतो. शिक्षक व विद्यार्थ्यांची आकाशात नजर आणि जमिनीवर पाय असतील तर यशस्वी होणे सहज शक्य होईल. त्यासाठी धैर्य, चिकाटी आणि परिश्रमाची गरज आहे. कारण यशाच्या सिढीला सिमा किंवा अंत नसतो, म्हणून आयुष्यभर नवनिर्मिती करून जीवनात यश संपादन करा.
अभयकुमार साळुंखे म्हणाले, शिक्षणमहर्षी बापूजींनी संस्काराची शिदोरी दिली. संस्थेच्या सचिव प्राचार्य शुभांगी गावडे यांनी पुरस्काराबद्दल माहिती दिली. प्राचार्य डॉ. राजेंद्र शेजवळ यांनी प्रास्ताविक केले. यावेळी प्राचार्य आर. आर. कुंभार, संस्थेचे सहसचिव प्राचार्य डॉ. युवराज भोसले, उपाध्यक्ष नामदेव कांबळे, कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, रोहन पवार, प्रविण देशमुख आदी उपस्थित होते.